नामविस्तार आंदोलन : परिवर्तनवादी चळवळीच क्रांतिकारी पर्व

 मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार होऊन २६ वर्ष झाली पण अजूनही लढा कायम स्मरणात राहतो. रिवर्तनवादी चळवळीचं शक्तीपीठ म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे पाहिले जाते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी म्हणजेच "नागसेनवन". आज ही १४ जानेवारी हा दिवस आठवला की, नामविस्ताराच्या जखमा आठवतात. हा लढा काय होता ? किती लोकांचं बलिदान त्यामागे आहे ? हा लेख लिहीण्यांमागील हाचं प्रमुख उद्देश आहे.




चळवळीची पार्श्वभूमी :-


मराठवाड्यातल्या आजच्या ज्येष्ठ लोकांनी हा लढा प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे भोगला आहे. त्या 17 वर्षांतील नामांतर लढ्यानं दिलेले घाव आजही ताजे आहेत. भलेही जखमा भरून निघाल्या असतील. पण व्रण अन् वेदना अजूनही कायम आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, 'जे आपला इतिहास विसरतात ते आपले भविष्य घडवू शकत नाहीत' या लढ्याचा इतिहास असाच प्रेरणादायी आहे. हा लढा कुणाच्या अस्मितेला ठेच पोहोचवणारा नव्हता. ज्या डॉ. बाबासाहेबांनी झोपडी-झोपडीत ज्ञानाचा प्रकाश आणला, त्या महामानवाला अभिवादन करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न होता.
हे केवळ आंदोलन नव्हते, तर त्याला सामाजिक लढ्याचे स्वरूप आलं होतं. अनेक पुरोगामी संघटना आणि व्यक्तींचा या लढ्याला सक्रिय पाठिंबा मिळत होता. विरोधकही गप्प नव्हते. तेही दंड थोपटून उभे ठाकले होते. म्हणून तर नामांतराची लढाई संपायला १७ वर्षं लागली. एवढा दीर्घकाळ हा संघर्ष लांबत गेला.

विद्रोही चळवळ

1972ला दलित पॅंथरची स्थापना झाली. गायरान जमिनी मिळाव्यात, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ व्हावी, गावातील पाणवठ्यांवर पाणी भरता यावे, यासाठी दलित पॅँथरचं आंदोलन सुरू होतं. त्या बरोबरच औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे, ही मागणी जोर धरू लागली.

1974च्या मराठवाडा विकास आंदोलनातही नामांतराची मागणी झाली. दलित युवक आघाडी ही नामांतराची याचा पाठपुरावा करत असे. 1977ला तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी या मागणीची दखल घेतली. तसं आश्वासनही दिलं. मात्र 1978 ला महाराष्ट्रात सरकार बदललं. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुलोद सरकार सत्तारूढ झालं. विधान परिषदेत आमदार पा. ना. राजभोज यांनी मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर करावे, अशी मागणी लावून धरली होती.

मुख्यमंत्री झालेल्या शरद पवार यांनी नामांतराबाबत पुढाकार घेतला. विधानसभा आणि विधानपरिषद सदस्यांची संयुक्त बैठक घेऊन नामविस्ताराचा ठराव मंजूर केला. दिनांक 27 जुलै 1978ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अशी घोषणा झाली. भविष्यात मात्र वेगळेच वाढून ठेवलेलं होतं. वास्तविक पाहता नामांतर हे एक साधे आंदोलन होते. पण नामांतराला त्वेषाने विरोध केला गेला, तेवढ्याच तीव्रतेने दलितांच्या या आंदोलनाला लढ्याचे स्वरूप आले. दलितांना एकटे पाडले जात होतं. हर तऱ्हेने दलितांची कोंडी केली जात होती, छळ केला जात होता. अत्याचारात भयानक क्रूरता होती. विशेष म्हणजे हल्लेखोर मोकाट सुटले होते.

नामविस्तारास विरोध :-

दलित पँथर नेते प्रा. अरुण कांबळे यांनी या नामविस्तारास विरोध दर्शविला. पँथरला निर्भेळ नामांतर हवे होते. त्यामुळे नामांतर विरोधकांच्या हाती आयते कोलीत आले. रात्रीतून नामांतर विरोधात दंगली सुरू झाल्या. एक दीड वर्ष मराठवाडा नामांतराच्या आगीत घुसमळत होता. दलितांच स्वाभिमानाने जगणं हेचं समाजविघातक इसमांना खुपत होत याचं कारणांसाठी काही संघटनांनी नामविस्तारास विरोध केला होता.


प्रसिद्ध साहित्यिक कमलेश्वराची भेट :-

प्रख्यात हिंदी लेखक विचारवंत कमलेश्वर औरंगाबाद येथे येऊन गेले. परिवर्तनाच्या चळवळीत आगीत होरपळून गेलेल्या मराठवाड्यात त्यांनी भेट दिली होती व आढावा घेतला होता.


चळवळीतले लढवय्ये :-

समाजात समता व बंधुता टिकून रहावी या साठी अनेक महापुरूषांनी, संतानी या मातीत वरील मुल्यांची बिजे रोवली. कुठल्याही ठिकाणी समाजविघातक शक्ती ही धोकादायक असती हे आपल्याला आपलां इतिहासच आजतागायत सांगत आलाय. बाबा आढाव, बाबा दळवी, बापूराव जगताप, अ‍ॅड. अंकुश भालेराव ही मातब्बर मंडळी नामांतरवाद्यांची बाजू मांडत होती. पुष्कळ जणांनी या लढ्यात तुरुंगवास भोगला. जिवावर उदार होऊन
या लढ्यांसाठी अनेक लढवय्यानी आपले बलिदान दिले. टेंभुर्णी येथील पोचीराम कांबळे, जनार्दन मवाडे, गौतम वाघमारे (नांदेड), विलास ढोने (पश्चिम महाराष्ट्र), गोविंदराव भुरेवार, प्रतिभा तायडे, सुहासिनी बन्सोड,चंदर कांबळे, नारायण गायकवाड, शरद पाटोळे, रोशन बोरकर, कैलास पंडित, दिलीप रामटेके, अविनाश डोंगरे आदी. विरांनी या नामविस्तारांसाठी आपले बलिदान दिले.


समतेच्या चळवळीतले नेतृत्व :-

दलित पँथरच्या चळवळीने राजा ढाले, नामदेव ढसाळ, अरुण कांबळे, ज. वि. पवार, रामदास आठवले, गंगाधर गाडे असे अनेक धडाडीचे आणि झुंझार नेते महाराष्ट्राला दिले. तद्वत नामांतर लढ्याने मराठवाडाभर नेते निर्माण केले तसेच कार्यकर्त्यांची मोठी फळी उभी केली.
संतांची भूमी म्हणविणाऱ्या मराठवाडय़ात स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सामाजिक समतेचे मूल्य कितपत रुजले याची कसोटी पाहणाराच नामांतराचा लढा होता  व या कसोटीत मराठवाडा नापास झाला; पण त्याच वेळी महाराष्ट्रात नि मराठवाडय़ात पुरोगामी दलितेतर मित्रांनी नामांतराची बाजू घेऊन परिवर्तनवादी चळवळीस बळ दिले. त्यात एस.एम. जोशी, नानासाहेब गोरे, ग.प्र. प्रधान, कॉ. शरद पाटील, बापूसाहेब काळदाते, डॉ. बाबा आढाव, डॉ. कुमार सप्तर्षी, प्रा. बापूराव जगताप, म.य. दळवी, डॉ. अरुण लिमये, अशा किती तरी दलितेतर मंडळींनी तसेच अनेक कार्यकर्त्यांनी स्वकीयांचा रोष पत्करून नामांतराचा लढा पुढे नेला हे विसरता येत नाही.
एका गटाने अस्मितेची लढाई लढली, तर दुसऱ्याने नामांतर जीवन मरणाचा प्रश्न करून टाकला होता. शेवटी एका विद्यापीठाची फाळणी झाली. एकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद तर दुसऱ्याला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड अशी विस्तारित नावं दिली गेली. तो नामविस्तार दिन (१४ जानेवारी) म्हणून मोठ्या उत्साहाने औरंगाबाद येथे साजरा केला जातो.

नामांतराचा लढा हा केवळ विद्यापीठाची पाटी बदलणारा नव्हता, तर तो समता, स्वातंत्र्य, बंधुभाव पुढे नेणारा लढा होता. नामांतर झाले, मात्र बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली सामाजिक मूल्ये रुजली नाही.

नामांतर विरोधकांनी केवळ दलितांवरच आपला राग काढला नाही तर सरकारी मालमत्तांवरही हल्ले चढवले. यावेळी झालेल्या हिंसाचाराचा तपशील सरकार दरबारी उपलब्ध आहे.


प्रतीक कुकडे.




Comments