दोन हजार नंतरच्या काळातील स्त्री समीक्षकांचे योगदान

 दोन हजार नंतरच्या काळातील स्‍त्री समीक्षकांचे योगदान 

 

‘स्‍त्री समीक्षकांचे एकविसाव्‍या शतकातील योगदान’विचारात घेताना एकतर समीक्षकनिहाय मांडणी करणे किंवा ग्रंथनिहाय परामर्श घेत काही निरीक्षणे नोंदवता येतील. यापैकी कोणत्‍याही पद्धतीचा अवलंब केला तरीही काही रिक्‍त जागा राहण्‍याची शक्‍यता आहे. म्‍हणून येथे स्‍त्री समीक्षकांचे समीक्षेतील ग्रंथनिहाय कालक्रमिक कार्य लक्षात घेतले आहे. यामध्‍येही स्‍त्री समीक्षकांनी सैद्धांतिक व उपयोजित समीक्षेत दिलेले योगदान अशी वर्गवारी केली आहे. वर्तमान शतकातील दोन दशकांमध्‍ये नियतकालिके, उपयोजित समीक्षेतील वृद्धी, वाङ्मय प्रवाह व प्रकारनिष्‍ठ समीक्षा, विद्यापीठीय विभाग/साहित्‍य संस्‍था आणि समीक्षा, स्‍त्री समीक्षेचे वेगळेपण व स्‍त्री समीक्षकांकडून अलक्षित राहिलेली क्षेत्रे असा विचार केला आहे. या मांडणीला काही प्रमाणात परिचयाचे, आढाव्‍याचे स्‍वरूपदेखील येण्‍याची शक्‍यता आहे. या वीस वर्षाच्‍या काळात विपुल मुद्रण तंत्रज्ञान आणि संशोधक-अभ्‍यासक यांचे प्रमाणदेखील पुष्‍कळच वाढलेले आहे. या वाढीव ग्रंथांचा दर्जा हा नंतरचा भाग आहे; परंतु यापैकी अनेक ग्रंथ उपलब्‍ध न झाल्‍यामुळे या मांडणीला निश्चितच मर्यादा आहेत. 


मराठी ललित साहित्‍याप्रमाणेच पुरुषांच्‍यानंतर स्त्रियांचा समीक्षा क्षेत्रात प्रवेश झालेला आहे. अगदी १९५० पर्यंत स्त्रियांच्‍या समीक्षेचे केवळ चार ग्रंथ प्रकाशित असल्‍याची नोंद दाते सूचीमध्‍ये आहे. याउलट पुरुष समीक्षकांच्‍या समीक्षेची स्थिती आहे. पुढे यामध्‍ये बदल झाला आणि स्‍त्री समीक्षकांनी मराठी समीक्षा क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. यामुळे एकविसाव्‍या शतकातील स्‍त्री समीक्षकांचा विचार करण्‍यापूर्वी २० व्‍या शतकातील समीक्षकांनी केलेल्‍या पायाभरणीची नोंद करणे अपरिहार्य वाटते. गोदावरी केतकर, कुसुमावती देशपांडे, उषा देशमुख, दुर्गा भागवत, विजया राजाध्‍यक्ष, सरोजिनी वैद्य, इंदुमती शेवडे, माया सरदेसाई, उषा हस्‍तक, रेखा साने इनामदार, सुहासिनी इर्लेकर, सुषमा करोगल, प्रभा गणोरकर, सुधा जोशी, अरूणा ढेरे,जया दडकर, उमा दादेगावकर, अश्विनी धोंगडे, तारा भवाळकर, पुष्‍पलता राजापुरे-तापस, मंगला वरखेडे, अंजली सोमण इ. यापैकी काही स्‍त्री समीक्षकांचे लेखनकार्य ए‍कविसाव्‍या शतकातदेखील सुरू आहे.


• सैद्धांतिक समीक्षा : 

 २० व्या शतकाच्‍या उत्‍तरार्धामध्‍ये विज्ञान-तंत्रज्ञानासह समाजाच्‍या सर्वच क्षेत्रात विस्‍मयकारक प्रगती झाली. माहिती तंत्रज्ञान व प्रसार माध्‍यमांच्‍या जाळ्याने अवघे विश्‍व कवेत घेतले. साठोत्‍तरी काळात आपल्‍याकडे मराठी साहित्‍यात विविध वाङ्मयीन प्रवाहांचा उदय झाला. या प्रवाहातील साहित्‍याच्‍या विश्‍लेषण व मूल्‍यमापनासंदर्भात स्‍वतंत्र विचारव्युहांची चर्चा सुरू झाली. सोबतच सत्‍तरच्‍या आसपास विविध समीक्षा दृष्टिकोनांच्‍या परिचयास प्रारंभ झाला. पाठोपाठ जागतिकीकरणाचा बोलबाला सुरू झाला. थॉमस फ्रिडमन म्‍हणतो त्‍याप्रमाणे जगाची वाटचाल सपाटीकरणाच्‍या दिशेने सुरू झाली. विविध देशांमध्‍ये अंतर निर्माण करणाऱ्या भिंती अस्‍तंगत झाल्या. मायक्रोसॉफ्टने ‘विंडोज’ ही कार्यप्रणाली (ऑपरेटिंग सिस्टिम) सुरू केली आणि अवघे विश्‍व एका खिडकीतून डोकावून पाहता येऊ लागले. यामध्‍येच इंटरनेट सुविधेची भर पडली. गूगल या सर्च इंजिनचा उदय झाला. पाठोपाठ मोबाईल नावाच्‍या वस्‍तूने क्रांती केली. या सर्व ऐतिहासिक, अभूतपूर्व घटनांचे पडसाद सामान्‍य माणसासह समाज, साहित्‍य, संस्‍कृती व कलांवरदेखील पडले. मानवी जीवनातील वाढत्‍या व्यामिश्रतेचा परिणाम साहित्‍यादी कलांवरदेखील झाला. यामुळे साहित्‍यादी कलांचा यथायोग्‍य आस्‍वाद, आकलन, विश्‍लेषण, अर्थनिर्णयन व मूल्‍यमापन होण्‍यासाठी साहित्‍याबरोबरच समाजशास्‍त्र, मानसशास्‍त्र, तत्त्वज्ञान, इतिहास, धर्म, भाषाशास्‍त्र, अर्थशास्‍त्र, राज्‍यशास्‍त्र, पर्यावरण, विज्ञान, तंत्रज्ञान, संस्‍कृती, साहित्‍येतर कला अशा अनेकविध ज्ञानशाखांचा अभ्‍यास आवश्‍यक झाला. यामुळे कधी काळी प्रचलित असणारी साहित्‍य मूल्‍यमापनाची तत्त्वे, कसोट्यांमध्‍ये बदल स्‍वीकारणे अपरिहार्य झाले. परिणामी आपल्‍याकडे पाश्‍चात्त्य सिद्धांत, वाद, विचारप्रणालींचा अवलंब वाढला. यामध्‍ये इंग्रजी जाणणारे प्राध्‍यापक, अभ्‍यासक हे आघाडीवर होते, आहेत. विसाव्‍या शतकाच्‍या शेवटच्‍या टप्‍प्‍यात अशा सर्व प्रणालींचे आयातीकरण वाढले. (रा. रा. भालचंद्र नेमांड्यांच्‍या भाषेत ‘स्‍मगलिंग’वाढले.) प्रभाव वाढला. उसणवारी वाढली. काळानुरूप मराठी साहित्‍यातील व्‍यापक अवकाश समजून घेऊन कलाकृतीच्‍या मूल्‍यमापनासाठी मराठी समीक्षेने संदर्भलक्ष्‍यी होणे अपरिहार्य झाले. “मराठी समीक्षेत पाश्‍चात्त्य  विचारांचा आणि साहित्‍य सिद्धांतांचा प्रभाव आहेच परंतु संदर्भ सोडून त्‍यांचा सर्रास वापरही केला जातो. म्‍हणून या काळात मानसशास्‍त्रीय, मानववंशशास्‍त्रीय, समाजशास्‍त्रीय इत्‍यादी ज्ञानक्षेत्रांचा आधार घेऊन निर्माण झालेले सिद्धांत कुठलाही विचार न करता आयात केले गेले.” (किंबहुने) पाश्‍चात्त्य  सिद्धांत, वाद वा उपपत्‍तींचा परिचय, त्‍यांचे भाषांतर वा अनुवाद/आयातीकरण हे साहित्‍य व सांस्‍कृतिक व्‍यवहार समृद्धतेसाठी योग्‍य आहे; परंतु आपल्‍या देशातील सामाजिक, राजकीय, सांस्‍कृतिक, भाषिक व नैसर्गिक पर्यावरण/परिस्थितीसापेक्ष यामध्‍ये बदल करणे आवश्‍यक होते. या आयातीकरणामध्‍ये पुरुष समीक्षक आघाडीवर असल्‍याचे स्‍पष्‍टपणे जाणवते. विशेष म्‍हणजे मराठी समीक्षेतील या उसणवारीविषयी ज्‍येष्‍ठ समीक्षक सुधीर रसाळ, हरिश्‍चंद्र थोरात, रवींद्र किंबहुने, भालचंद्र नेमाडे, आनंद पाटील प्रभृतींनी भाष्‍य केलेले आहे. 


साधारणत: सत्‍तरच्‍या आसपास सुरू झालेल्‍या पाश्‍चात्त्य विचारव्‍यूहांनी विसाव्‍या शतकाची शेवटची दशके प्रभावीत केली. विविध दृष्टिकोन व विचारव्‍यूहांचे मराठी समीक्षेत अधिकाधिक उपयोजन होऊ लागले. सोबतच विविध अभ्‍यासक, संशोधक व समीक्षकांकडून समीक्षा ग्रंथाद्वारे सैद्धांतिक समीक्षा समृद्ध करण्‍याचा प्रयत्‍न झाला. एकविसाव्‍या शतकाच्‍या सुरुवातीला सैद्धांतिक समीक्षेच्‍या संदर्भातील दोन महत्त्वाचे कोश प्रसिद्ध झाले. या दोन्‍ही कोशांच्‍या संपादनामध्‍ये मराठीतील ख्‍यातनाम स्‍त्री समीक्षकांचा सहभाग आहे, हे विशेष. ‘वाङ्मयीन संज्ञा-संकल्‍पना कोश’ हा ग. रा. भटकळ फाउण्‍डेशनद्वारे डिसेंबर २००१ मध्‍ये प्रकाशित झालेला आहे. या कोशाच्‍या संपादनात समीक्षक वसंत आबाजी डहाके, सदानंद भटकळ व रमेश वरखेडे यांच्‍या समवेत प्रभा गणोरकर, जया दडकर व आशा राजवाडे या स्‍त्री समीक्षक/अभ्‍यासकांचा सहभाग आहे. या कोशाच्‍या संपादक नामावलीमध्‍ये समीक्षक प्रभा गणोरकर यांचे नाव अग्रभागी आहे.  यानंतर नोव्‍हेंबर २००२ मध्‍ये ‘मराठी वाङ्मयकोश खंड चौथा समीक्षा-संज्ञा’ या महाराष्‍ट्र राज्‍य साहित्‍य आणि संस्‍कृती मंडळामार्फत सिद्ध झालेल्‍या कोशाच्‍या समन्‍वयक संपादक विजया राजाध्‍यक्ष आहेत. या दोन्‍ही ग्रंथांमध्‍ये समीक्षेतील तात्त्विक संकल्‍पनांची नोंद आहे. शिवाय पाश्‍चात्त्य अभ्‍यासक, समीक्षकांच्‍या संदर्भातील नोंदी आहेत. परंतु मराठीमध्‍ये वाङ्मयीन वादांच्‍या संदर्भातील दोन महत्त्वाच्‍या ग्रंथांच्‍या संपादनात स्त्रियांचा सहभाग नाही. यापैकी ‘वाङ्मयीन वाद : संकल्‍पना व स्‍वरूप’ हा प्रा. गो. म. कुलकर्णी गौरवग्रंथ नोव्‍हेंबर १९९० मध्‍ये प्रकाशित झालेला आहे. या ग्रंथाच्‍या संपादनामध्‍ये स्‍त्रीचा सहभाग नसला तरी प्रस्‍तुत निबंध लेखनात शोभा पवार या केवळ एकमेव स्‍त्री समीक्षकांचा सहभाग आहे. (यामध्‍ये एकूण अठरा लेख आहेत.) शोभा पवार यांनी ‘फॉमलिझम’विषयी लेखन केलेले आहे. यावरून मराठी साहित्‍य व्‍यवहारात इंग्रजीची सक्रियता आणि मराठीजनांचा तोकडेपणा लक्षात येतो. हा ग्रंथ विसाव्या शतकातील असला तरी मराठीमध्‍ये वादांविषयीचे जे निवडकग्रंथ उपलब्‍ध आहेत. त्‍यापैकी हा एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ आहे. ‘समीक्षेतील नव्‍या संकल्‍पना’ हा याच मालिकेतील एक ग्रंथ. या ग्रंथाचे संपादन मनोहर जाधव यांनी केलेले आहे. यामध्‍ये भारतीय व पाश्‍चात्त्य वादांविषयी चौदा लेख आहेत. पैकी प्रा. मंगला वरखेडे व प्रा. अरूणा दुभाषी या दोन स्‍त्री समीक्षकांच्‍या लेखांचा अंतर्भाव आहे. हे दोन्‍ही लेख स्‍त्रीवादाच्‍या संदर्भातील आहेत. यापूर्वी १९९९ मध्‍ये ‘निवडक मराठी समीक्षा’ हा साहित्‍य अकादेमी, नवी दिल्‍ली यांनी प्रकाशित केलेला एक महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. या ग्रंथाचे संपादन गो. मा. पवार व म. द. हातकणंगलेकर या समीक्षकद्वयांनी केलेले आहे. या ग्रंथात १८७२ ते १९९० या साधारणत: शंभर वर्षातील मराठी समीक्षेच्‍या वाटचालीत महत्त्वाच्‍या असलेल्‍या प्रातिनिधिक निबंधांची निवड करण्‍यात आलेली आहे. या ग्रंथातील २९ निबंधापैकी केवळ एका स्‍त्री निबंधकारांचा-कुसुमावती देशपांडे यांचा ‘इंग्रजी काव्‍य आणि मराठी मनोवृत्‍ती’ हा निबंध समाविष्‍ट आहे. पुढे डिसेंबर २००४ मध्‍ये ‘विसाव्‍या शतकातील मराठी समीक्षा’ (संपा.विलास खोले) हा ग्रंथ प्रसिद्ध झाला. या ग्रंथात प्रस्‍तावना व सूचीसह नऊ लेख आहेत. पैकी सहा निबंधांपैकी ‘काव्‍यसमीक्षा’ (नीलिमा गुंडी), ‘नाट्यसमीक्षा’ (शुभदा शेळके)व ‘कथासमीक्षा’ (भारती निरगुडकर) हे तीन निबंध स्‍त्री समीक्षकांचे आहेत. हे प्रमाण पुरुष समीक्षकांच्‍या बरोबरीचे आहे. अर्थात ही बरोबरी केवळ संख्‍यात्‍मक नाही, तर गुणात्‍मकदेखील आहे. या सर्व कोश-ग्रंथांचा उल्‍लेख करण्‍यामागील हेतू मराठी समीक्षा क्षेत्रातील स्‍त्री-पुरुष समीक्षकांच्‍या वास्‍तव-व्‍यवहाराकडे लक्ष वेधणे हा आहे. 


२१ व्‍या शतकातील दोन दशकांमध्‍ये मराठी सैद्धांतिक समीक्षेमध्‍ये योगदान देणाऱ्या स्‍त्री समीक्षकांचे प्रमाण मात्र अल्‍प आहे. पुरूष समीक्षकांप्रमाणे पूर्णवेळ समीक्षेला वाहून घेणे. सातत्‍याने वाचन-चिंतन-मनन-लेखन ही प्रक्रिया काही अपवाद वगळता नव्या पिढीतील स्‍त्री-पुरुष समीक्षकांकडून होताना दिसत नाही. सध्‍याच्‍या गतिमानी काळात चालण्‍यापेक्षा पळण्‍याला अधिक गती आहे. त्‍यामुळे एखाद्या विषयाला/क्षेत्रात निष्‍ठेने वाहून घेणे आणि आयुष्‍यभर ते क्षेत्र समृद्ध करत राहणे, यासारख्‍या गोष्‍टी घडत नाहीत. शिवाय आज २१ व्‍या शतकात वावरत असताना कितीही नाही म्‍हटले तरी स्त्रियांच्‍या मागे घर-संसार-कुटुंब-मुलं-नोकरी-व्यवसाय या जबाबदाऱ्या असल्‍याचाही परिणाम त्‍यांच्‍या निर्मितीवर होतो. या पार्श्‍वभूमीवर स्‍त्री समीक्षकांच्‍या सैद्धांतिक समीक्षेतील कामगिरीकडे पाहावे लागते. 

 

मराठी साहित्‍यामध्‍ये म. मो. कुंट्यांपासून ते अगदी वर्तमान काळातील ज्‍येष्‍ठ समीक्षकांनी मराठीच्‍या स्‍वतंत्र साहित्‍यशास्‍त्राची अपेक्षा व्‍यक्‍त केलेली आहे. संत कवींच्‍या कवितेतून आलेले स्‍वतंत्र काव्‍यशास्‍त्र असेल वा केशवसुतांनी कवितेद्वारे याविषयी मांडलेली भूमिका असेल या भूमिकेला पुढे घेऊन जाण्‍याचे, तिला भक्‍कम सैद्धांतिक आधार देण्‍याचे कार्य मा. गो. देशमुखांसारखे काही अपवाद वगळता सक्षमपणे झालेले नाही. आजची आपली समीक्षा ही ‘मधल्‍या स्थिती’त आहे. तिची अवस्‍था मराठी भाषेसारखी झालेली आहे. आपल्‍या संस्‍कृत साहित्‍यशास्‍त्राचा आजच्‍या आधुनिक दृष्‍टीने अन्‍वयार्थ न लावणे आणि इंग्रजीसारख्‍या परकीय भाषेचे नीटपणे आकलन नसताना समीक्षा सिद्धांतांचे उपयोजन करणे असे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यामुळे मराठी समीक्षेचे पर्यायाने साहित्‍याचेदेखील नुकसानच झाले आहे. ही स्थिती केवळ अलीकडच्‍या दोन दशकातील नाही, तर “गेल्‍या पन्‍नासएक वर्षापासून मराठी समीक्षेचा निर्वाह केवळ पाश्‍चात्‍य साहित्‍यविचारांवर होत आहे. परंतु इंग्रजीसारख्‍या परकीय भाषेतील सैद्धांतिक समीक्षेचे मराठी वाङ्मयाच्‍या अभ्‍यासकांना नीटपणे आकलन करता येणे शक्‍य होत नाही.” (रसाळ) अशा स्थितीत काही स्‍त्री अभ्‍यासक-समीक्षकांनी संस्‍कृत साहित्‍यविचारांची कालसुसंगत मांडणी केली आहे. डॉ. लीला गोविलकर यांनी ‘भारतीय साहित्‍यविचार’ (२००३) या ग्रंथात प्रथमत: काव्‍यस्‍वरूपाची चर्चा करून अलंकार, वक्रोक्ती, रीति, ध्‍वनी, रस व औचित्यविचारांची आधुनिक मीमांसा केली आहे. तर शेक्‍सपियर, इब्‍सेन, ब्रेख्‍त इ. पा‍श्‍चात्‍त्‍य मीमांसकांच्‍या विचारांइतकाच भरत मुनींचा नाट्यविचार आजही महत्त्वाचा आहे. त्‍याची अभिनयकेंद्री मांडणी डॉ.सरोज देशपांडे यांनी ‘भरतमुनींचे नाट्यशास्‍त्र अभिनयकेंद्री’ (२००८) या ग्रंथात केली आहे. या विवेचनाचे वेगळे सूत्र म्‍हणजे ‘अभिनय’ या नाटकातील महत्त्वाच्‍या घटकाला त्‍यांनी केंद्रवर्ती ठेवले आहे. याप्रमाणेच छंदशास्‍त्र हा महत्त्वाचा; पण आधुनिक काळातील मुक्‍तछंद कवितेमुळे काहीसा बाजूला असलेला विचार. छंदशास्‍त्राच्‍या अभ्‍यासक, समीक्षक डॉ. शुभांगी पातुरकर यांनी ‘छंदोमीमांसा’ (जून २०१७) या ग्रंथाद्वारे छंदाची परंपरा, प्रयोग, चिकित्‍सा, रसग्रहण व आढावा अशी सैद्धांतिक व तात्त्विक मीमांसा केली आहे. यापूर्वीदेखील त्‍यांनी ‘मराठी मुक्‍तछंद’ व ‘छंद : शास्‍त्रीय समीक्षा’ या दोन ग्रंथांद्वारे छंद व मुक्‍तछंदाच‍े विस्‍तृत विवेचन करून कालसापेक्ष अन्‍वयार्थ लावला आहे.  


आजपर्यंत पाश्‍चात्त्य तत्त्वज्ञानाच्‍या परिप्रेक्ष्‍यातून मराठी साहित्‍याची वैविध्‍यपूर्ण समीक्षा झाली आहे. विविध पाश्‍चात्त्य इझमचा (भारतीय अभावात्‍मक) उपयोग करून साहित्‍यकृतींचे आकलन-विश्‍लेषण-अन्‍वयार्थ व मूल्‍यमापनात्‍मक समीक्षेचे प्रयत्‍न झाले आहेत. पण अशा तत्त्वज्ञानाचे उपयोजन करण्‍याचे प्रमाण स्‍त्री समीक्षकांमध्‍ये अल्‍प आहे (अपवाद स्‍त्रीवाद). डॉ. रेखा साने-इनामदार यांनी अस्तित्‍ववादी विचारप्रणालीचा अवलंब करून मराठी कादंबरीचा अभ्‍यास केला आहे. मराठी साहित्‍यविश्‍वात ७५ ते ८५ हे दशक महिलांच्‍या दृष्‍टीने जसे महत्त्वाचे होते, तसेच अस्तित्‍ववादीची चर्चादेखील या काळात झाली. मराठी साहित्‍य व समीक्षेवरील अस्तित्‍ववादाचा असलेला प्रभाव लक्षात घेऊन रेखा साने-इनामदार यांच्‍या प्रबंधाचा सिद्ध झालेला ग्रंथ म्‍हणजे ‘अस्तित्‍ववाद आणि मराठी कादंबरी’ (ऑगस्‍ट २००४) होय. पाश्‍चात्त्य अस्तित्ववादी तत्त्वज्ञानात कीर्केगार्ड, नीत्‍शे, यास्‍पर्स, मार्सेल, हायडेगर, काम्‍यू व सार्त्र यांनी क्रांतीपूर्ण भूमिका निभावली. या वादाचा अनेक देशातील साहित्‍य, कला व समीक्षेवर प्रभाव पडला. या सर्व अस्तित्‍ववादी जडणघडणीचा डॉ. रेखा यांनी परामर्श घेत ‘अस्तित्‍ववाद’ ही संकल्‍पना स्पष्‍ट करून अस्तिकता-नास्तिकता, स्‍वातंत्र्य, परात्‍मता, असंगतता, जीवनप्रणाली इ. अस्तित्‍ववादी आशयसूत्रे विशद केली आहेत. सोबतच तत्त्वज्ञान आणि साहित्‍य यातील परस्‍परसंबंधाची तात्त्विक मीमांसा करत ‘कोसला’, ‘बॅरिस्‍टर अनिरूद्ध धोपेश्‍वरकर’, ‘पुत्र’, ‘सात सक्कं त्रेचाळीस’, ‘एन्‍कीच्‍या राज्‍यात’ या मराठी कादंबऱ्यांचे अस्तित्‍ववादी अंगाने विश्‍लेषण केले आहे. हा किंवा असे काही अपवाद वगळता स्त्री समीक्षकांनी असे प्रयत्‍न केल्याचे दिसत नाही. 


वैश्विक स्तरावर विसाव्‍या शतकाच्‍या उत्‍तरार्धाच्‍या प्रारंभी स्‍त्रीवादी साहित्‍य आणि समीक्षेची मीमांसा सुरू झाली. आपल्‍याकडे मात्र आंतरराष्‍ट्रीय महिला वर्ष (१९७५) व आंतरराष्‍ट्रीय महिला दशका (१९८५) नंतर स्‍त्रीवादी साहित्‍य व समीक्षा विचारास आरंभ झाला. ‘अनुष्‍टुभ’च्‍या सप्‍टें.-ऑक्‍टो.१९८७ च्‍या अंकात शिरीन कुडचेकर यांचा ‘स्‍त्रीवादी साहित्‍यसमीक्षा’ हा लेख प्रसिद्ध झाला. तद्नंतर अश्विनी धोंगडे, मंगला वरखेडे यांचे स्‍त्रीवादी सााहित्‍य व समीक्षेचे तात्त्विक विवेचन करणारे ग्रंथ सिद्ध झाले. यानंतर स्‍त्री अभ्‍यासकांनी स्‍त्रीवादी साहित्‍याचा अभ्‍यास करण्‍याची पद्धती प्रचलित झाली. अलीकडे दोन हजार नंतरच्‍या काळातदेखील स्‍त्रीवादी तत्त्वप्रणालीचा पाश्‍चात्त्य तसेच भारतीय>मराठी समाज-संस्‍कृती-धर्म-राजकारण-अर्थकारण-पर्यावरण-भाषा-लिंगभाव-प्रदेश-प्रवाह-प्रवृत्ती संदर्भाने विस्‍तार वाढत जाऊन स्‍त्रीवाद केंद्रवर्ती असलेल्‍या समीक्षाग्रंथाची अधिक निर्मिती झाली.    


‘स्‍त्रीवादी विचार आणि स्‍त्री समीक्षेचा मागोवा’ (२००७) हा स्‍त्रीवादी समीक्षक डॉ. शोभा पाटील यांचा मराठी साहित्‍य-व्‍यवहारातील स्‍त्रीवादाची वेगळी मांडणी करणारा ग्रंथ. तत्‍पूर्वी त्‍यांनी स्त्रियांच्‍या आत्‍मचरित्रांचा स्‍त्रीवादी दृष्टिकोनातून प्रबंधग्रंथ सिद्ध केला आहे. स्‍त्रीवादी विचार हा पाश्‍चात्त्य देशातून आपल्‍याकडे आला. यामुळे त्‍यांनी पाश्‍चात्त्य स्‍त्रीवाद>मराठीतील स्‍त्रीवाद>वाङ्मय क्षेत्रातील स्‍त्रीवाद अशी विस्‍तृत मांडणी केली आहे.  याकरिता पती-पत्‍नी, लैंगिकता, उत्‍पादनक्षमता, विवाहसंस्‍था, कुटुंबसंस्‍था या घटकानुसार विवेचन करून वाङ्मय क्षेत्रामध्‍ये कशा प्रकारे गायनोसेंट्रिक आणि अँड्रोसेंट्रिक पद्धतीने व्‍यवहार होतो, हे त्‍या मांडतात. प्रकाशक सुमती लांडे व श्रुती तांबे यांनी संपादित केलेल्‍या ‘स्‍त्रीवाद’ (२००७) या ग्रंथात स्‍त्रीवादाची तात्त्विक मांडणी आहे. हा ग्रंथ सहा विभागात विभागलेला असून पहिला भाग - स्‍त्रीवाद : संकल्‍पना आणि सिद्धांत, दुसरा– स्‍त्रीवाद : विविध भूमिका (कार्यकर्त्‍या स्त्रियांच्‍या मुलाखती), तिसरा- स्‍त्रीवाद : काही दृष्टिकोन, चौथा- स्‍त्रीवादी दृष्टिकोनातून काही प्रश्‍नांचा मागोवा, पाच- स्‍त्रीवाद- जगताना/समजून घेताना, सहा- स्‍त्रीविषयक काही विचार, सात- संस्‍था परिचय/स्‍त्रीविषयक पुस्तकांची सूची अशी स्‍त्रीवादाची वेगळी व अनुभूतीपूर्ण वास्‍तव मांडणी या ग्रंथात येते. तद्नंतर ‘सांस्कृतिक प्रवाहांची स्‍त्रीवादी समीक्षा’- डॉ. वंदना महाजन (एप्रिल २०११) या ग्रंथात स्‍त्रीवादी चळवळीसोबतच स्‍त्रीवादातील विविध प्रवाह, धर्मपरंपरा, ग्रामीण संस्‍कृती, वर्ग-वर्ण-जातव्‍यवस्‍था, प्रसारमाध्‍यमे, राजकारण आदींची स्‍त्रीवादी दृष्‍टीने समीक्षा आहे. स्‍त्रीवादी मांडणीच्‍या मालिकेतील ‘संदर्भासहित स्‍त्रीवाद : स्‍त्रीवादाचे समकालीन चर्चाविश्‍व’-जाने.२०१४ (संपा. वंदना भागवत, अनिल सपकाळ, गीतांजली वि. म.) हा वेगळी चर्चा करून दिशा देणारा समीक्षा ग्रंथ आहे. ज्‍येष्‍ठ सामाजिक कार्यकर्त्‍या विद्या बाळ यांच्‍या कार्यगौरवानिमित्त निर्माण केलेल्‍या ५७९ पृष्‍ठाच्‍या या ग्रंथात विविध अभ्‍यासकांनी केलेली स्‍त्रीवादी तत्त्वज्ञान, लिंगभाव, जागतिकीकरण, विविध धर्म व स्‍त्री, स्‍त्रीवादी जाणिवा आणि साहित्यप्रकार इ. संदर्भात विस्‍तृत मांडणी आहे. ‘स्‍त्रीवाद, साहित्‍य आणि समीक्षा’-वंदना भागवत (डिसें.२०१८) या ग्रंथातदेखील स्‍त्रीवादाची तात्त्विक मांडणी आहे. ‘स्‍त्रीवाद’ या संकल्‍पनेचा उहापोह करून पाश्‍चात्त्य व भारतीय स्‍त्रीवादाचा आढावा आहे. तसेच स्‍त्रीवादी साहित्‍य व  समीक्षेच्या मांडणीसह ग्रंथाच्‍या दुसऱ्या भागात स्‍त्रीवादी समीक्षेचे उपयोजन आहे.


विविध वादांप्रमाणेच समाजशास्‍त्रीय, मानसशास्‍त्रीय, मार्क्‍सवादी, आदिबंधात्‍मक, ऐतिहासिक, चरित्रात्‍मक, प्रत्‍ययनिष्‍ठ, मूल्‍यविवेकनिष्‍ठ, रूपवादी, सौंदर्यवादी, शैलीवैज्ञानिक, स्‍त्रीवादी, संभाषणात्‍मक, नवसमीक्षा यांसारख्‍या समीक्षा दृष्टिकोन प्रमाणकांचा अवलंब करून विविध साहित्‍यकृतींची समीक्षा करण्‍याचे प्रकारही वाढले आहेत. एका अर्थाने नवीन पिढीकडून अशा प्रकारचे साचे तयार करून कलाकृतीकडे पाहिले जाते. येथे मला ज्‍येष्‍ठ समीक्षक हरिश्‍चंद्र थोरात यांचे विधान उद्धृत करणे आवश्‍यक वाटते. या आयातीकरणाविषयी थोरात म्‍हणतात, “आपल्‍याकडे विविध पाश्‍चात्‍य सिद्धान्‍तव्‍यूहाचे जे उपयोजन केले जाते ते पाहिले की मला माझ्या खेड्याकडच्‍या सायकल दुरुस्‍तीच्‍या दुकानाची आठवण येते. या दुकानदाराकडे एक पेटी होती. तिच्‍यात वेगवेगळे पान्‍हे, साधने होती. एक पान्‍हा काढायचा, लावून पाहायचा, लागला नाही तर दुसरा काढायचा असा व्‍यवहार असे. मराठी समीक्षेमध्‍ये याच प्रकारचे पाश्‍चात्‍य पान्‍हे वापरले जातात. सायकलचा दुकानदार ते बसतात की नाही हे पाहत असे. आम्‍ही आमच्‍या बौद्धिक हत्‍यारांची तेवढीही काळजी घेत नाही.” (थोरात) परंतु बौद्धिक व्‍यवहार करणारे स्‍त्री समीक्षक मराठी साहित्‍यात आहेत. यापैकीच एक डॉ.मनीषा खैरे होत. डॉ. मनीषा यांनी स्‍त्रीवाद आणि मार्क्‍सवाद या दोन विचारप्रणालींचा समन्‍वय साधून नावीन्‍यपूर्ण दृष्‍टी देणारा ‘मार्क्‍सवादी समीक्षेचे स्‍त्रीवादी वाचन’ (ऑक्‍टो.२०१९) हा ग्रंथ सिद्ध केला आहे. यामध्‍ये भारतातील मार्क्‍सवाद, मार्क्‍सवादी चळवळ, पाश्‍चात्त्य मार्क्‍सवाद-साहित्य-समीक्षा आदींचे वाचन-आकलन-विश्‍लेषण-उपयोजन आहे. तसेच मराठीतील प्रसिद्ध मार्क्‍सवादी समीक्षक दि. के. बेडेकर, शरच्चंद्र मुक्तिबोध, शरद पाटील, के. रं. शिरवाडकर, लालजी पेंडसे, गं. बा. सरदार, दिगंबर पाध्‍ये यांच्‍या समीक्षाविचाराचे स्‍त्रीवादी वाचन हा एक वेगळा दृष्टिकोन समोर येतो. मार्क्‍सवाद असेल वा स्‍त्रीवाद असेल या व अन्‍य तत्त्वप्रणालींमध्‍ये समाजिक व सांस्‍कृतिक तत्त्व महत्त्वाचे आहे. या पलीकडे जाऊन साहित्‍याचे सामाजिक व सांस्‍कृतिक अंगाने विश्‍लेषण करून अन्‍वयार्थ लावण्‍याचे सातत्याने प्रयत्‍न झाले, होत आहेत. या सामाजिक मालिकेतील ‘आधुनिक मराठी साहित्‍य आणि सामाजिकता’ (मार्च २००७) हा समीक्षाग्रंथ होय. डॉ. मृणालिनी शहा व डॉ. विद्यागौरी टिळक यांनी या ग्रंथाचे संपादन केले आहे. साहित्‍य व सामाजिक अनुबंध संदर्भाने महाराष्‍ट्रातील प्रबोधनाची वाटचाल, साहित्‍याचे समाजशास्‍त्र, मराठी माणसांची ऐतिहासिक जडणघडण, नवे संहितालक्ष्‍यी सिद्धान्‍तव्‍यूह व सामाजिकता, संदर्भलक्ष्‍यी साहित्‍यसिद्धान्‍त व सामाजिकता, स्त्रियांच्‍या साहित्‍यातील सामाजिकता, महानगरी आधुनिक साहित्‍यातील सामाजिकता इत्‍यादीसोबतच ग्रामीण कादंबरी, लोकप्रिय साहित्‍य, मराठी नाटक, दलित साहित्‍य इ. तात्त्विक चर्चा करणारे निबंध मराठी साहित्‍याच्‍या सामाजिक अभ्‍यासाला नवे आयाम प्रदान करतात. अशीच सैद्धांतिक संकल्‍पनांची चर्चा असणारा ‘समीक्षासंहिता’(मार्च २०१२) हा एक ग्रंथ होय. डॉ. भारती निरगुडकर यांनी विविध चर्चासत्रात सादर केलेल्‍या शोधनिबंधांचा हा संग्रह आहे. हे शोधनिबंध चर्चासत्रातील असले तरी यामध्‍ये स्‍त्रीवाद, कथनमीमांसा, लेखकाभ्‍यास, मानसशास्‍त्रीय व समाजशास्‍त्रीय समीक्षा असे अंत:सूत्र आहे. 


विद्यार्थी व नव अभ्‍यासकांनी काहीशी क्लिष्‍ट वाटणारे समीक्षाशास्‍त्र सुलभ परचियात्‍मक पद्धतीने मांडण्‍याचे प्रयत्‍न प्रत्‍येक काळात होतात. असेच विद्यार्थीसापेक्ष प्रयत्‍न प्रा. नीला पांढरे यांनी केले आहेत. ‘समीक्षा आणि समीक्षा पद्धती’ (जाने. २०१४) व ‘मराठी समीक्षेची वाटचाल’ (जुलै २०१६) या पुस्‍तकात समीक्षेचा तात्त्विक परिचय आहे. दोन्‍ही ग्रंथात समीक्षा म्‍हणजे काय? समीक्षकाची साधना, मराठी समीक्षेची वाटचाल, स्‍वातंत्र्योत्‍तर काळातील समीक्षाप्रवाह आणि मराठीतील उल्‍लेखनीय सत्तर समीक्षकांचा परिचय आहे. 


मराठी साहित्‍यात समीक्षेची समीक्षा करण्‍याचे फारसे प्रयत्‍न होत नाहीत. यामागे विविध कारणे आहेत. पण सध्‍याच्‍या काळात जे काही वेगळे प्रयत्‍न केले आहेत त्‍यामध्‍ये ‘गाडगीळांची समीक्षारूपे’-प्रा.भारती निरगुडकर व ‘प्रादेशिक ग्रामीण साहित्‍य : समीक्षेची समीक्षा’-डॉ. रेखा जगनाळे (मार्च २००७) या ग्रंथाची आवर्जून दखल घ्‍यावी लागते. नवकथाकार गंगाधर गाडगीळ यांचे मराठी समीक्षेतील योगदान लक्षणीय आहे. त्‍यांच्‍या समीक्षेविषयी प्रा. भारती निरगुडकर यांनी ‘गंगाधर गाडगीळांची समीक्षा आणि समीक्षाविचार’हा विषय घेऊन पीएच.डी.चा अभ्‍यास केला. या प्रबंधाचे ‘गाडगीळांची समीक्षारूपे’ हे ग्रंथरूप आहे. गाडगीळांनी कविता, कथा, नाटक, अन्‍य साहित्‍यप्रकार व लेखकलक्ष्‍यी इ. संदर्भाने समीक्षालेखन केले आहे. त्‍यांच्या या समीक्षेसह नवसाहित्‍य, त्‍यांचे स्‍वत:चे साहित्‍य, त्‍यांची साहित्‍य-समीक्षादृष्‍टी आणि समीक्षेची समीक्षा अशी व्‍यापक मीमांसा निरगुडकरांनी केली आहे. साहित्यिकांचे व्‍यक्तित्‍व आणि कर्तृत्‍व असा अभ्‍यास मराठी साहित्‍यात मुबलक प्रमाणात आहे; पण समीक्षकाचे व्यक्तिमत्त्व आणि समीक्षा असा अभ्‍यास नगण्‍य आहे. प्रस्‍तुत अभ्‍यास हा उपयोजित जरी असला तरी मराठी समीक्षेत अत्‍यंत महत्त्वाचा आहे. साठोत्‍तरी काळातील प्रादेशिक-ग्रामीण साहित्‍याच्‍या समीक्षेचे पुनर्वाचन करून नवी मांडणी डॉ. रेखा यांनी नवी मांडणी केली आहे. 


• नियतकालिके व समीक्षा 

प्रारंभ काळातील नियतकालिके असोत वा साठच्‍या काळातील अभिरूची, युगवाणी, हंस, नवभारत, साहित्‍य, प्रतिष्‍ठान, मराठी संशोधन पत्रिका, छंद, पंचधारा, आलोचना, समाज प्रबोधन पत्रिका, ललित, अस्मितादर्श, महाराष्‍ट्र साहित्‍य पत्रिका इत्‍यादी नियतकालिके असोत, या नियतकालिकांनी सातत्‍याने समीक्षेला, स्‍त्री समीक्षकांना जोपासण्‍याचे/संवर्धनाचे कार्य केले आहे. यापैकी ‘आलोचना’ हे निव्‍वळ समीक्षेला वाहिलेले मासिक १९६२ मध्‍ये सुरू झाले ते अर्थकारणाच्‍या ओढग्रस्‍तीमुळे १९९१ मध्‍ये बंद पडले. कमीअधिक प्रमाणात हीच स्थिती अनेक नियतकालिकांची आहे. काही नियतकालिके ही अनितकालिकांसारखी निघत आहेत. अशा कठीण काळात ‘मुक्‍त शब्‍द’, ‘खेळ’, ‘कवितारती’ ‘ललित’, ‘महाराष्‍ट्र साहित्‍य पत्रिका’, ‘नव अनुष्‍टुभ’, ‘प्रतिष्‍ठान’ सारखी नियतकालिके सातत्‍य राखून आहेत. अलीकडील काळात ‘मुक्‍त शब्‍द’ : संपादकीय, ‘शाळा कादंबरीची निवेदन व्यवस्‍था’-निलांबरी कुलकर्णी (सप्‍टें.२०१५), ‘भारतीय स्‍त्रीवाद : स्‍वरूप व आव्‍हाने’-वंदना भागवत (मार्च २०१७), ‘खेळ’ : मिथक विशेषांक, ‘ललित’ : समीक्षा विशेषांक (एप्रिल २०१३) , ‘प्रतिष्‍ठान’ : डॉ. सुधीर रसाळ ह्यांची मराठी कथा-कादंबरी-समीक्षा’-उषा हस्‍तक (मे-ऑ. ०३), ‘अनुराधा पाटील यांची कविता : एक स्‍त्रीवादी आकलन’-माया पंडित, ‘अनुराधा पाटील यांच्‍या कवितेतील प्रतिमासृष्‍टी’-सुषमा करोगल (जा-ए. १४), ‘चंद्रकांत पाटील यांची निजखूण प्रकट करणारी कविता’-प्रभा गणोरकर (स-ऑ. १४), ‘समीक्षा विशेष अंक’ (मे-जू १५), ‘वा. रा. कांत यांच्‍या नाट्यकाव्‍यातील स्‍त्रीप्रतिमा’-डॉ.अरुणा चौधरी (स-ऑ. १८), ‘मराठी संत कवयित्रींची बंडखोरी’-संगीता मोरे (जा-ए. २०), ‘नव अनुष्‍टुभ’: ‘देशीवाद : राष्‍ट्रवादाला आणि एकूणच अस्मितावादी राजकारणाला समर्थ पर्याय’-प्राची गुर्जरपाध्‍ये (मे-जू. १८); ‘अस्मितादर्श’ : ‘लिंगभाव आणि भारतातील सांस्‍कृतिक राजकारण’-डॉ.वंदना महाजन (वार्षिक विशेषांक १५); ‘अक्षरगाथा’ : मराठी साहित्‍यविचार विशेषांक (एप्रि. १४); ‘आमची श्रीवाणी’ : ‘भारतीय स्‍त्रीवाद : बदलते आयाम’ विशेषांक – भाग १ (ऑ.१६ ते जाने. १७), भाग २ (फे.-मे १७) तसेच अलीकडे संपादक सतीश तांबे, गणेश कनाटे यांनी ‘सजग’ या त्रैमासिकाद्वारे ‘समीक्षा ‘सजग’ व्‍हावी म्‍हणून...’ नव्‍याने पावलं टाकायला सुरूवात केली आहे, हेही विशेष. 


• उपयोजित समीक्षा 

समीक्षा आणि साहित्‍य यांचा सहसंबंध असतो. उत्तम साक्षेपी समीक्षा जशी उत्तम दर्जाच्‍या साहित्‍य निर्मितीला कारणभूत असते, तशीच उत्तम साहित्‍य निर्मितीदेखील समीक्षा सिद्धांतनासाठी बळ देत असते. आपल्‍याकडे उत्तमोत्तम नवनवीन सिद्धांत आकार घेत नाहीत, याचा अर्थ आपल्या साहित्‍याकडून असे बळ मिळत नाही का? असा प्रश्‍न पडतो. अगदी मुंबई विद्यापीठात मराठी विभाग सुरू झाल्‍यापासून प्रारंभी विद्यार्थ्‍यांकरिता ग्रंथांवर लिहिणे, तद्नंतर नियतकालिकांची गरज म्‍हणून लिहिणे, येनकेन प्रकारेन ग्रंथावर लिहिले जाते कालसापेक्ष साहित्‍य व समीक्षेत झालेल्‍या बदलांमुळे आस्‍वाद, विश्‍लेषण, मूल्‍यमापन, रूप, लेखनतंत्र/शैली, विविध दृष्टिकोन/सिद्धांत, तुलना इत्‍यादीचा अवलंब करून कलाकृतीकडे पाहिले जाते. तसेच विशिष्‍ट कालखंड, समाज व संस्‍कृती अध्‍याहृत धरूनही समीक्षा केल्याने यामध्‍ये भर पडत गेली. शिवाय विविध विद्यापीठांमधून झालेले एम.फिल./पीएच.डी./पोस्‍ट डॉक्‍टरेट/डी.लिट. चे संशोधन प्रबंध ग्रंथरूपात आल्‍याने‍ही या समीक्षेत वृद्धी दिसते. 


मध्‍ययुगीन साहित्‍य 

मध्‍ययुगीन मराठी साहित्‍याच्‍या अभ्‍यासक-समीक्षक डॉ.सुहासिनी इर्लेकर यांनी संत जनाबाई व त्‍यांच्‍या कवितेची मीमांसा ‘संत जनाबाई’ (जून २००२) द्वारे केली आहे. तसेच संत जनाबाईंचा जीवनपट, त्‍यांची झालेली उपेक्षा, जनाबाईंच्‍या भक्तिजीवनातील विकसनशील परिवर्तने, जनाबाईंचे सांप्रदायिक काव्यकर्तृत्व आणि जनाबाईंच्‍या अभंगातून होणारे सामाजिक प्रबोधनाच्‍या संदर्भात साक्षेपी विवेचन आहे. संत जनाबाईंच्‍या कवितेची समीक्षा असलेला डॉ. रेखा जगनाळे यांचा ‘संत कवयित्री जनाबाई काव्‍यदर्शन’(२००९) हा एक ग्रंथ. या ग्रंथात कवयित्री जनाबाईंच्‍या कवितेतील आशय-रचनासौंदर्य, व्‍यक्तिमत्त्व आदींची मांडणी आहे. 


समीक्षक डॉ. सुहासिनी इर्लेकर यांचा ‘ज्ञानियांचा राजा’(डिसें.२००४) हा संत ज्ञानेश्‍वरांच्‍या काव्‍याचे विश्‍लेषण करून अन्‍वयार्थ लावणारा ग्रंथ. यामध्‍ये यादवकालीन सांप्रदायिक काव्‍यपरंपरा, ज्ञानेश्‍वरीची प्रेरणा, ज्ञानेश्‍वरांचे गूढात्‍म अभंग, अभंगातील प्रतिमा व काव्‍यात्‍मकता आणि संत ज्ञानेश्‍वर व जॉन डन यांचा तौलनिक अभ्‍यास आहे. ‘संत कवी आणि कवयित्री : एक अनुबंध’ (२००६) या समीक्षाग्रंथात डॉ. इर्लेकरांनी महदंबेचे धवळे, ज्ञानेश्‍वरांचे अभंग, मुक्‍ताबाई, नामदेव, जनाबाई, तुकाराम, बहिणाबाई, वेणाबाई इ. कवींच्‍या कवितेतील अनन्‍यसाधारणत्‍व, काव्‍यप्रकृती, सांप्रदायिकता, प्रतिमासृष्‍टी, शैली व मर्यादा इ. संदर्भात महत्त्वपूर्ण विश्‍लेषण केले आहे. 


आद्य मराठी महाकवी नरेंद्र यांच्‍या ‘रुक्मिणीस्‍वयंवर’या काव्‍याने प्रेरित होऊन डॉ.सुहासिनी इर्लेकर यांनी ‘नरेंद्रकृत आद्य मराठी महाकाव्‍य’ हा ग्रंथ मे २००७ मध्‍ये सिद्ध केला. कवी नरेंद्राचे ‘रुक्मिणीस्‍वयंवर’ हे मराठी काव्‍यसृष्‍टीतील कैलास लेणे आहे. नरेंद्राच्‍या या कवितेविषयी पूर्वसुरींनी केलेल्या लेखनाचा आढावा घेत इर्लेकरांनी संस्‍कृत महाकाव्‍यातील परिवर्तनांचे विवेचन केले आहे. तसेच‘रुक्मिणीस्‍वयंवर’मधील किन्‍नराख्‍यान, व्‍यक्तिचित्रण, साक्षात्‍कारी वर्णने, प्रबंधकाव्‍य व भाविक अलंकार, प्रबंधकाव्‍यातील नाट्यरूपे आणि कवी नरेंद्रांचे समकालीन असणारे संत ज्ञानेश्‍वर व महदंबा यांच्‍याही कवितेचा संदर्भ घेत विवेचन केले आहे. विशेष म्‍हणजे ‘रुक्मिणीस्‍वयंवर’चे भाषिक विश्‍लेषण करताना इर्लेकरांनी आधुनिक शैलीविज्ञान तत्त्वांचा उपयोग केला आहे. तसेच त्‍यांनी विविध चर्चासत्रांच्‍या निमित्‍ताने लिहिलेले, वाचलेले निबंध ‘साहित्‍य संवाद’(मार्च २००७) या ग्रंथात संकलित केले आहेत. यामध्‍ये भारतीय साहित्‍यशास्‍त्रातील लोकतत्त्व, संतसाहित्‍य, मराठी गीतकाव्‍य, प्रादेशिक साहित्‍य, साहित्‍यातील स्‍त्रीवाद, मराठी बालगीते इ. विषयासंदर्भातील समीक्षात्‍मक लेख आहेत. ‘आद्य मराठी आत्‍मचरित्रकार : संत नामदेव’ (२००९) या ग्रंथात डॉ. सु‍हासिनी इर्लेकर यांनी ‘आद्य आध्‍यात्मिक आत्‍मचरित्र’ या दृष्‍टीने संत नामदेवांच्‍या आत्‍मपर अभंगाचे विवेचन केले आहे. या विवेचनात त्‍यांनी संत नामदेवांचे गुरू, समकालीन संत आदींच्‍या कवितेचा आधार घेत नामदेवांचे आत्‍मचरित्र साक्षेपी स्‍वरूपात अलिप्‍तपणे मांडण्‍याचा प्रयत्न केला आहे. 


लोकसाहित्‍य 

२१ व्या शतकात लोकसाहित्‍याच्या अभ्‍यास व संशोधनाचे प्रमाण देखील कमी झाल्याचे दिसते. जो अभ्‍यास होतो आहे, तो भटके समुदाय, प्रदेश, आदिवासी, विविध बोलीतील लोकसाहित्‍य संदर्भाने. परंतु हा अभ्‍यास ग्रंथाद्वारे येण्‍याचे प्रमाण अल्‍प आहे. अलीकडील काळात विविध प्रदेश>विभाग>जिल्‍हा>तालुका>गाव पातळीवर मुद्रण व प्रकाशनाच्या सुविधा सुरू झाल्‍याने अशा खेड्यापाड्यातून प्र‍काशित झालेली पुस्‍तके सर्वत्र पोहोचत नाहीत. नामांकित प्रकाशकदेखील अशा नवख्‍या अभ्‍यासकांचे ग्रंथ सहजासहजी प्रकाशित करत नाहीत. शिवाय अलीकडे वृत्ती मिळाली तरच सर्वेक्षण-संकलनाचे काम करायचे, नसता टेबल वर्क करायचे हा प्रकारही अधिक आहे. यामुळे लोकसाहित्‍य, बोलीभाषांच्‍या अभ्‍यास-संशोधनाकडे दुर्लक्ष होत आहे. खरे तर नवनवीन दृष्टिकोनांचा/तत्त्वप्रणालींचा अभ्‍यास करून प्रस्‍तुत विषयांची नावीन्‍यपूर्ण मांडणी करता येणे शक्‍य आहे.  


डॉ. प्रतिमा इंगोले यांनी ‘वऱ्हाडी लोकगीतांचा चिकित्‍सक अभ्‍यास’ (एप्रिल २०१३) या प्रबंधग्रथांत मांडला आहे. यामध्‍ये लोकगीत संकल्‍पना, लोकगीतांची पूर्वपरंपरा, वैशिष्‍ट्ये, लोकभाषा, आविष्कार शैली संदर्भाने विश्‍लेषण आहे. ‘वऱ्हाडी बोलीतील लोकसाहित्‍य : स्‍वरूप आणि समीक्षा’ हा डॉ.लता लांजेवार यांचा वऱ्हाडी लोकसाहित्‍याविषयीचा आणखी एक समीक्षा ग्रंथ. यामध्‍ये वऱ्हाडी लोकगीते, लोककथा, लोकनाट्यातील म्‍हणी, वाक्‍प्रचार, उखाणे, सुवचने, रूढी-परंपरा, व्‍यावसायिक व आर्थिक जीवन, कौटुंबिक जीवन आदींचा समग्रतेने परामर्श आहे. 


‘मराठवाड्यातील लोकसाहित्‍याचे वैभव’ (मार्च २०१५) या ग्रंथात डॉ. शशिकला कांबळे यांनी मराठवाडा व महाराष्‍ट्र–कर्नाटक सीमाप्रदेशातील गीते व जात्‍यावरील ओवी गीतींचे विश्‍लेषण करून आधुनिक दृष्‍टीने अन्‍वयार्थ लावला आहे. मराठवाडा या प्रदेशाची ऐतिहासिक, सामाजिक, सांस्‍कृतिक, भौगोलिक, धार्मिक व भाषिक पार्श्‍वभूमी विशद करून महाराष्‍ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागातील स्‍त्री गीते, पुरुषगीते, बहुरूपी गाणी, पोतराज, वासुदेव, धनगरी सुंबरान, जात्‍यावरील ओवीगीते, पाळणा व पुरुषांच्‍या पारंपरिक लोकगीतांची मीमांसा केली आहे. तर लोकसाहित्‍य व ग्रामीण साहित्‍याचा समन्‍वय साधत डॉ. नलिनी महाडिक यांनी ‘लोकसाहित्‍य आणि ग्रामीण साहित्‍य यांचे स्‍वरूप’ (२०१६) हा अभ्‍यासग्रंथ सिद्ध केला आहे. यामध्‍ये लोकगीते, लोककला, ग्रामीण साहित्‍याचा मूलाधार प्राकृत प्राच्‍यभाषा, ग्रामीण कथा, स्‍त्रीदर्शन, स्‍त्रीप्रतिमा अशी अनुबंधात्‍मक मांडणी आहे. 


साहित्‍य प्रकारांची समीक्षा  

कथा : ‘कथा : संकल्‍पना आणि समीक्षा’ (फेब्रु. २०००) या ग्रंथात कथेच्‍या अभ्‍यासक डॉ. सुधा जोशी यांनी ‘कथे’चे सैद्धांतिक विवेचन केले आहे. सोबतच मराठीतील का‍ही निवडक कथाकारांच्‍या कथांविषयी मानसशास्‍त्रीय, आदिबंधात्‍मक,  समाजशास्‍त्रीय, ऐतिहासिक व अनुबंधात्‍मक विमर्श आहे. ‘मराठी कथाशंभरीतील स्‍त्रीचित्रण’ (जुलै २००१) या पुस्‍तकात तारा परांजपे यांनी १८९० ते १९९० या शंभर वर्षातील निवडक कथाकारांच्‍या कथांमध्‍ये आलेल्‍या स्‍त्रीचित्रणाचा आढावा घेत मीमांसा केली आहे. समीक्षक डॉ. मंगला वरखेडे यांनी ‘स्त्रियांचे कथालेखन : नवी दृष्‍टी, नवी शैली’ (जून २००५) मध्‍ये मराठीतील कमल देसाई, गौरी देशपांडे, आशा बगे, प्रिया तेंडुलकर, पद्मजा फाटक, ऊर्मिला पवार या कथालेखिकांच्‍या प्रयोगशील कथांतील नवी दृष्‍टी व शैलीची स्‍त्रीवादी दृष्‍टीने समीक्षा केली आहे. त्‍यांनी स्त्रियांच्‍या कथा लेखनाची उद्दिष्‍टे, स्‍वरूप, प्रयोगशीलता लक्षात घेऊन या साहित्‍यातील सामाजिक-सांस्‍कृतिक आंतरसंबंध, शरीरकेंद्री अनुभवविश्‍व, मानसिक ताण-तणाव आणि या लेखिकांनी स्‍त्रीच्‍या सत्त्वाची घडवलेली भाषा इ. संदर्भाने मीमांसा केली आहे. 


कादंबरी : मराठीमध्‍ये विपुल कादंबरीलेखन झालेले आहे. कादंबरीचा अभ्‍यास मोठ्या प्रमाणात आशयात्‍मक होतो. विशेषत: प्रबंध हे आशयसंपृक्‍त असतात.  ‘मराठी कादंबरी : स्त्रियांचे योगदान’-डॉ. प्रमिला भिरूड (जून २००३) हा एक प्रबंधग्रंथ. या ग्रंथात १८८५ ते १९४७ या काळातील स्‍त्री कादंबरीच्‍या स्‍वरूप-विशेषांची आशयात्‍मक चर्चा आहे. तर ‘लघुकादंबरीचे साहित्‍य स्‍वरूप’ (डॉ. स्‍वाती कर्वे) या ग्रंथात मराठी लघुकादंबरी ही संकल्पना, लघुकादंबरीची निर्मितीप्रक्रिया, इतिहास आणि महत्त्वाच्‍या लघुकादंबरीकारांचा परामर्श आहे. डां. वंदना महाजन यांनी ‘वामन मल्‍हार जोशी लिखित मराठी कादंबरीतील स्‍त्रीवाद’ (नोव्‍हें. २००७) या ग्रंथात कादंबरीकार वामन मल्‍हार जोशी यांच्‍या कादंबऱ्यांची स्‍त्रीवादी दृष्‍टीने मांडणी केली आहे. या ग्रंथात प्रथम ‘स्‍त्रीवाद’ या संकल्‍पनेची चर्चा, वामन मल्‍हारांच्‍या वाङ्मयीन कर्तृत्‍वाचा वेध आणि ‘रागिणी’, ‘आश्रमहारिणी’, ‘नलिनी’, ‘सुशीलेचा देव’, ‘इंदू काळे व सरला भोळे’ या कादंबऱ्यातील स्‍त्रीजीवन, नायिका व त्‍यांच्या कार्याचे स्‍त्रीवादी भूमिकेतून तुलनात्‍मक विश्‍लेषण आहे. येथे स्‍त्रीवादाबरोबरच सामाजिक व सांस्‍कृतिक दृष्टीने केलेली मांडणी या ग्रंथाचे वेगळेपण सिद्ध करते. 


‘मराठी दलित कादंबरीतील स्‍त्री-चित्रण’- मार्च २००८ (कवयित्री डॉ.ज्‍योती लांजेवार) या ग्रंथात अण्‍णाभाऊ साठे, शंकरराव खरात, बाबुराव बागूल इ. कादंबरीकारांच्‍या कादंबरीतील स्‍त्री चित्रण स्‍वरूपाचा उहापोह आहे. तर ‘मराठी कादंबरीचे अंतरंग’-डॉ. नलिनी महाडिक (२००९) या ग्रंथात मराठी राजकीय कादंबऱ्यांची गांधीवाद, मार्क्‍सवाद व शैलीदृष्टीने मांडणी आणि काही निवडक कादंबऱ्यांची समीक्षादेखील आहे. मराठीमध्‍ये रूजलेल्‍या आत्‍मचरित्रात्‍मक कादंबरीविषयीचा ‘आत्‍मचरित्रात्‍मक कादंबरी : वाङ्मयप्रकार व वाङ्मयचर्चा’-डिसें.२०१० (डॉ.महालक्ष्‍मी मोराळे) हा एक अभ्‍यासग्रंथ. या ग्रंथातील पहिल्‍या भागात आत्‍मचरित्र, कादंबरी व आत्‍म‍चरित्रात्‍मक कादंबरी अशी चर्चा आहे. तद्नंतर मराठीतील आत्‍मचरित्रात्‍मक कादंबऱ्या व आत्‍मचरित्रसदृश्‍य कादंबऱ्यांचे विश्‍लेषण आहे. 


कविता : डॉ. आशा सावदेकर यांच्‍या ‘काव्‍यगंगेच्‍या तटावर’( ऑक्‍टो. २००५) या ग्रंथात कवी अनिल, शरच्‍चंद्र मुक्तिबोध, ना. घ. देशपांडे, ग्रेस, सुरेश भट, म. म. देशपांडे, इंदिरा संत, वसंत बापट, भा. रा. तांबे, पद्मा गोळे, बा. भ. बोरकर, श्रीधर शनवारे, यशवंत मनोहर, प्रभा गणोरकर, श्रीपाद भालचंद्र जोशी, अरूणा ढेरे इ. कवींच्‍या निवडक कवितासंग्रहांची समीक्षा आहे. कवी मंगेश पाडगावकर यांच्‍या कवितेने मराठी रसिकांच्‍या मनावर अधिराज्‍य गाजवले आहे. त्‍यांच्‍या कवितेचा कांचन पाडगावकर यांनी संशोधनात्‍मक अभ्‍यास करून ‘आनंदयात्री पाडगावकर’ (२००५) हा प्रबंधग्रंथ सिद्ध केला आहे. यामध्‍ये डॉ.कांचन यांनी मंगेश पाडगावकर यांच्‍या कवितेचे भावकविता, नाट्यकविता, सामाजिक व राजकीय कविता, गीतकाव्‍य, बालकविता, किशोरकविता असे वर्गीकरण करून आस्‍वादात्‍मक विश्‍लेषण केले आहे. 


डॉ. अलका चिडगोपकर यांनी आधुनिक मराठी क‍वयित्रींच्‍या कवितांचा अभ्‍यास ‘अर्वाचीन मराठी कवयित्री (१८५०-१९४०)’ (२००७) या ग्रंथात मांडला आहे. यामध्‍ये मराठी संत कवयित्रींची काव्‍यपरंपरा, अठराव्‍या व एकोणिसाव्‍या शतकात मराठी कविता व कवयित्रींचा अभाव असल्‍याच्‍या कारणांची चर्चा केलेली असून अर्वाचीन काळातील केशवसुत संप्रदाय, पारंपरिक कविता, रविकिरण मंडळ असे कवितेचे टप्पे आणि त्‍यातील कवयित्रींच्‍या कवितेची समीक्षा आहे. 


समीक्षक डॉ. विजया राजाध्‍यक्ष यांनी कवी विंदा करंदीकर यांच्‍या समग्र साहित्‍याचे परिशीलन करून ‘बहुपेडी विंदा’ (खंड  १ व २) (मे २००५) हा द्विखंडात्मक ग्रंथ सिद्ध केला आहे. यातील दुसऱ्या खंडात विंदांच्‍या कवितेची आशयसूत्रे, आकृतिबंध, बालकविता, रूपविशेषात्‍मक अंगाने समीक्षा आहे. तसेच ‘कवितेपासून कवितेकडे’ (ऑगस्‍ट २०१२) यामध्‍ये डॉ. विजयाबाईंनी १९४० ते २०१० पर्यंतच्‍या निवडक कवींच्‍या कवितांचा सर्वांगीण वेध घेतला आहे. कवी केशवकुमार, बी.रघुनाथ, अनिल, कुसुमाग्रज, मंगेश पाडगावकर, र. कृ. जोशी, मलिका अमर शेख, प्रज्ञा लोखंडे-पवार इ. कवींनी निर्माण केलेली समर्थ परंपरा, त्‍यांचे योगदान आदींची विवेचक, साक्षेपी मीमांसा आहे. 


नाटक : ‘वेध नाटकांचा’-आरती कुळकर्णी (२००१) हा काही महत्त्वाच्‍या नाटकांची समीक्षा करणारा ग्रंथ. यामध्‍ये उपयोजित समीक्षेबरोबरच नाटककार, नाट्यसंहिता, पात्र, स्‍वभाव, संवाद आदी तत्‍त्वांनुसार समीक्षा आहे. सोबतच सुखात्मिका, शोकात्मिका, विधिनाट्य, चरित्रात्‍मक नाटक व विचारनाटक आदी नाटक प्रकारांची चर्चाही आहे.


मराठी नाट्यसृष्‍टीतील प्रतिभावंत नाटककार चिं. त्र्यं. खानोलकर यांच्‍या सात नाटकांची चिकित्‍सा ‘खानोलकरांची नाट्यसृष्‍टी’-प्रा. पुष्‍पलता राजापुरे-तापस (२००३) या ग्रंथात आहे. यामध्‍ये ‘नाट्यांग स्‍वरूप दर्शन’ या प्रकरणात भारतीय व पाश्‍चात्त्य मीमांसकांच्‍या मताधारे मांडणी करून दु:खाचे सात सर्ग, खानोलकरांची नाट्यप्रतिभा व नाट्यविशेषांविषयी विस्‍तृत मांडणी आहे. मराठी शोकांतिकेच्‍या संदर्भातील डॉ. तापस यांचा ‘मराठी शोकांतिका : नवविचार’ (फेब्रु. २००३) हा आणखी एक वेगळा विचार मांडणारा समीक्षाग्रंथ. यामध्‍ये ‘एकच प्‍याला’, ‘शांतता! कोर्ट चालू आहे’, ‘युगान्‍त’, ‘महापरिनिर्वाण’ या मराठी रंगभूमीवरील महत्त्वाचा कलाकृतींची समाजशास्‍त्रीय, मानसशास्‍त्रीय, रूपवादी व आदिबंधात्‍मक दृष्‍टीने समीक्षा असून एका कलाकृतीचा वेगवेगळ्या अंगाने विचार करत त्‍यातील अंत:स्‍तर स्‍पष्‍ट केले आहेत.


मराठी साहित्‍यात शोकात्मिकांची विपुल निर्मिती झाली नाही; परंतु उपलब्‍ध असणाऱ्या मराठी शोकात्‍म नाटकांचा पदवी निमित्‍ताने अभ्‍यास करून डॉ.उज्‍ज्वला जाधव यांनी ‘मराठी शोकात्‍म नाटके’(२००५) हा समीक्षा ग्रंथ सिद्ध केला आहे. यामध्‍ये मराठी नाट्यक्षेत्रात यशस्‍वी न झालेल्‍या शोकात्‍म नाटकांची मीमांसकांच्या मताधारे चर्चा करून १८५० ते २००० या दीडशे वर्षाच्‍या काळातील मराठी शोकात्‍म नाटकांचे विश्‍लेषण येते. डॉ. संध्‍या टिळक यांच्‍या ‘मराठी नाटकातील शोकांतिकेचा नवप्रवाह’ (ऑक्‍टो. २००९) या ग्रंथात शोकांतिकेचा सैद्धांतिक परामर्श आहे. या ग्रंथात प्रारंभी जागतिक स्‍तरावरील शोकांतिकाचा आढावा येतो. तद्नंतर मराठीत रूपांतरीत, अनुवादीत झालेल्‍या व स्‍वंतत्रपणे लिहिलेल्‍या शोकांतिकांचा वेध घेत ‘पाश्‍चात्त्य नाटकांतील शोकान्तिका भोगवादाच्‍या अतिरेकातून घडलेल्‍या दाखविल्‍या गेल्‍या आहेत, तर मराठी रंगभूमीवरील शोकांतिका त्‍यागवादाच्‍या अतिरेकातून साकार झाल्‍या’चे महत्त्वपूर्ण निरीक्षण डॉ. संध्‍या यांनी नोंदवले आहे. 


नाट्यसमीक्षक डॉ. मधुरा कोरान्‍ने यांच्या ‘स्‍त्री समस्‍या आणि आजचे नाटक’, ‘बोलता बोलता’ व ‘स्‍त्री नाटककारांची नाटके’ या ग्रंथांच्‍या नंतर ‘नाट्याक्षरे’ (२००६) हा नाट्यसमीक्षाविषयक महत्त्वाचा ग्रंथ. डॉ.कोरान्‍ने स्‍त्रीला केंद्रवर्ती ठेवून नाटकांची समीक्षा करतात. यामध्ये स्‍त्री प्रतिमा, हुंडा समस्‍या, कुटुंब, प्रेम, माहेर, मैत्री आणि अपत्‍यहीन स्‍त्री अशा घटकतत्त्वांनुसार आधुनिक मराठी नाटकांची मीमांसा येते. तर नाट्यतंत्राच्‍या संदर्भातील ‘तंत्र नाट्यदिग्‍दर्शनाचे’ (जाने. २००७) हा पुष्‍पा काणे यांचा समीक्षाग्रंथ. या ग्रंथात नाट्यसंहितेचा प्रयोगात्‍म विचार आहे. प्रयोग सादर होत असताना दिग्‍दर्शक-कलावंतांपासून-संगीत-प्रकाश-रंगमंच-वेशभूषा या सर्वांचे मिळून एक प्रयोगरूप आकारत असते. यामध्‍ये या सर्वांची असलेली सर्जनशीलता आणि त्‍यांचे उत्‍तरदायित्‍व, त्‍यातील प्रश्‍न आदींची सखोल चर्चा येते. येथे काणे यांनी भरतमुनी ते ब्रेख्‍त असा व्‍यापक संहितापट स्‍वीकारलेला आहे. 


‘मराठी नाटकातील स्‍त्री रूपे’ (डिसें. २००७) हा डॉ. शोभा देशमुख यांचा संशोधन ग्रंथ. यामध्‍ये आधुनिक स्‍त्रीजीवनाच्‍या पार्श्‍वभूमीवर ‘सं. शारदा’ ते ‘चारचौघी’ या नाटकातील स्‍त्री रूपांचा आजच्‍या स्‍त्रीवादाच्‍या अंगाने अभ्‍यास आहे. ‘संगीत शारदा : एक वाङ्मयीन घटना’ हा डॉ. अंजली जोशी यांचा डिसें. २००९ मध्‍ये प्रसिद्ध झालेला प्रबंधग्रंथ. या ग्रंथात गो. ब. देवलांच्‍या ‘संगीत शारदा’ या नाटकावरील टीकेचा परामर्श घेत समीक्षा केलेली असून ‘शारदा’ नाटकाचा वाङ्मय-कलाक्षेत्र व समाजावर झालेला परिणाम विशद केलेला आहे. ‘स्‍त्री-नाटककारांचे योगदान’हा देखील डॉ. सुधा पेशकर (जाने. २०१०) यांचा प्रबंधग्रंथ. या ग्रंथात साधारणत: दीडशे वर्षातील सामाजिक, कौटुंबिक, संगीत, रूपांतरीत, ऐतिहासिक, पौराणिक, विनोदी, मनोविश्‍लेषणात्‍मक नाटकांमध्‍ये नाटककारांनी दिलेल्या योगदानाची मीमांसा आहे. 


स्‍वातंत्र्यपूर्व काळ हा राष्‍ट्रभक्‍तीने भारावलेला होता. या काळातील स्‍वातंत्र्यवीर सावरकर, वासुदेवशास्‍त्री खरे, वीर वामनराव जोशी, कृ. प्र. खाडिलकर, पु. भा. भावे व वि. रा. हंबर्डे या जाज्‍वल्‍य राष्‍ट्रभक्‍तीचा पिंड असणाऱ्या नाटककारांच्‍या नाटकांची, त्‍यातील पात्र व विचारांची स्‍वातंत्र्य, राष्‍ट्रप्रेम, शौर्य, वीरता इ. मूल्‍यांच्‍या माध्‍यमातून डॉ. सुनंदा देशपांडे यांनी ‘स्‍वातंत्र्यसूक्‍ते गाणारे नाटककार’ (२०११) या ग्रंथाद्वारे समीक्षा केली आहे. ‘रंग नाटकाचे – आधुनिक रंगभूमी : नवे भान देणारी समीक्षा’ (२०१२) हा पुष्‍पा भावे यांचा नाट्यसंहिता-प्रयोगसंहिता-सादरीकरण असा वेगळा विचार असणारा समीक्षा ग्रंथ. आधुनिक रंगभूमीवरचे नाटक, त्‍याचे स्‍वरूप, नाटक म्‍हणजे काही मनोरंजन नव्‍हे, नाटक पहावे कसे? अनुभवावे कसे? आणि शोधावे कसे? असे साक्षात्‍कारी विवेचन हे या लेखनाचे सार आहे. यामध्‍ये ‘संहिता आणि प्रयोग’, ‘रंगकर्मी’ व‍ ‘विविधा’ असे तीन भाग असून पहिल्‍या भागात पाश्‍चात्त्य, हिंदी, मराठी नाटकांची संहिता, नाट्यशैली व प्रयोगात्‍म असे विवेचन आहे. दुसऱ्या भागात रंगकर्मींची माहिती आणि ‘विविधा’ अंतर्गत मराठी रंगभूमी, दिग्‍दर्शक, भाषांतर व नाट्य लेखनासंदर्भातील काही प्रश्‍नांची चर्चा आहे. 


‘भरतरंग’- कल्‍याणी हर्डीकर (२०१७) या ग्रंथात नाटक समन्‍वयाची मूलप्रवृत्ती, कलांची कला असलेले रंगनाटक, भारतीय रंगमंच, रंगमंडप आणि रंगमंच आदी संदर्भाने मांडणी आहे.


साहित्‍य प्रवाह 

दलित साहित्‍य : ‘दलित साहित्‍य’ (नीला पांढरे) या ग्रंथात दलित साहित्‍य संकल्‍पनेपासून दलित साहित्‍याची वैशिष्‍ट्ये, दलित साहित्‍य व निग्रो साहित्‍याचे परस्‍पर अनुबंध आणि दलित कथा, कादंबरी, कविता या साहित्‍य प्रकारांची निवडक सृजकांच्‍या संदर्भाने स्‍वरूप विशेषांची नोंद आहे. सोबतच दलित आत्‍मकथनांमधून समूह मनाची आलेली व्‍यथा, दारिद्य्र व भूकेचे चित्रण, ग्रामीण जीवन, स्‍त्रीजीवन आदी महत्त्वपूर्ण तत्त्वांच्‍या अनुषंगाने स्‍त्री-पुरुषांच्‍या आत्‍मकथनांचे विश्‍लेषण आहे. शिवाय आंबेडकरी जलसे, स्‍त्रीगीते, दलित नाटक, एकांकिका, पथनाट्ये, नाट्य चळवळीची परिचयात्‍मक नोंद करून महत्त्वाच्‍या दलित शाहीर व नाटककारांचे दलित रंगभूतीवरील योगदान विशद केले आहे. 


दलित आत्‍मकथनांनी मराठी साहित्‍याची दशा आणि दिशा बदलली. दलित आत्‍मकथनांपैकी स्त्रियांच्‍या आत्‍मकथनांचा अभ्‍यास कवयित्री श्‍यामल गरुड यांनी ‘दलित स्त्री आत्‍मकथने’ (डिसें. २०१०) या ग्रंथात मांडला आहे. यामध्‍ये ‘जिणं आमुचं’, ‘माज्‍या जल्‍माची चित्तरक‍था’, ‘अंत:स्‍फोट’, ‘मिटलेली कवाडे’, ‘रात्रंदिन आम्‍हां’, ‘आयदान’, ‘माझी मी’ यासह ‘मला उद्ध्‍वस्‍त व्‍हायचंय’, ‘मी नंदा’, ‘मी वनवासी’, ‘मरणकळा’, ‘सत्‍यशोधकांची वारस’, ‘मास्‍तरांची सावली’ इ. दलित जाणिवेच्‍या काठावरच्‍या काही आत्‍मचरित्रांची आशय, स्‍वरूप व भाषिक अंगाने विश्‍लेषण केले आहे.   


ग्रामीण : डॉ. अनिता काळे-जाधव यांचा ‘ग्रामीण साहित्‍यातील स्‍त्री दर्शन’ (डिसें. २०१३) हा प्रबंधग्रंथ. १९४० ते १९८० हा ग्रामीण जीवनातील स्थित्‍यंतराचा, संक्रमणाचा काळ. विविध साहित्यिकांनी या काळातील ग्रामीण जीवनाचे चित्रण केलेले आहे. डॉ.अनिता यांनी साधारणत: चाळीस वर्षातील कथा, कादंबरी, नाटक व कवितेतील स्‍त्री रूपांचा विमर्श मांडला आहे.


आदिवासी : ग्रामीण व दलित साहित्‍य प्रवाहांच्‍या पाठोपाठ आदिवासी साहित्‍य प्रवाहास प्रारंभ झाला. आदिवासी समाज, संस्‍कृती आणि त्‍यांचे जीवन हे आदिवसेतर समूहाच्‍या कायमच आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिलेले आहे. साधारणत: सत्‍तरच्‍या आसपास आदिवासींचे साहित्‍य मराठी निर्माण होऊ लागले. या साहित्‍याचे अध्‍ययन-संशोधनदेखील सुरू झाले. यातून डॉ. माहेश्‍वरी गावित यांचा ‘महाराष्‍ट्रातील आदिवासी साहित्‍य : एक अभ्‍यास’ हा प्रबंधग्रंथ २००८ मध्‍ये प्र‍काशित झाला. या ग्रंथात गावित यांनी प्रथमत: आदिवासी, आदिमता व आदिवासी साहित्‍य या संकल्‍पनांची तात्त्विक मीमांसा करून आदिवासी साहित्‍य प्रवाहातील लोकसाहित्‍य, कथा, कादंबरी, नाटक, चरित्र-आत्‍मचरित्र व कविता या साहित्‍याची आस्‍वादक वाटचाल मांडली आहे. तर ‘आदिवासी लोकपरंपरा’ (२००९) या दुसऱ्या ग्रंथात डॉ. गावित यांनी आदिवासी बोलीतील लोकसाहित्‍य, लोकनृत्‍य, आख्‍यायिका, दैवतकथा आणि मावची व डांगाण परिसरातील आदिवसींच्‍या गीत व सांस्‍कृतिक परंपरांचे विवेचन केले आहे. शिवाय ‘आदिवासी साहित्‍य : विविधांगी आयाम’ या ग्रंथात स्‍वातंत्र्य चळवळीपासून आदिवासी साहित्‍याचा वेध घेतला आहे. तसेच आदिवासी कथा, कादंबरी, कविता, नाटक, लोकसाहित्‍य व ललित साहित्‍याचे विश्‍लेषण करत त्‍यांनी आदिवासी स्त्री लेखिका व लेखकांच्‍या साहित्‍याची जागतिकीकरणाच्‍या संदर्भात समीक्षा केली आहे. 


स्‍त्रीवादी साहित्‍य : स्‍त्री समीक्षकांनी आंतरिक अनुबंध असलेल्‍या स्‍त्रीसाहित्‍य वा अन्‍य साहित्‍याची स्‍त्रीवादी दृष्टीने अधिक प्रमाणात समीक्षा केलेली आहे. पैकी बहुंताश ग्रंथात तात्त्विक चर्चा अधिक असल्‍याने त्‍यांचा विचार वर सैद्धांतिक समीक्षेत केला आहे. 


‘भारतीय संदर्भातून स्‍त्रीवाद : स्‍त्रीवादी समीक्षा आणि उपयोजन’(२००७)-शोभा नाईक या ग्रंथात अगदी थोडक्‍यात भारतीय संदर्भातून स्‍त्रीवाद व स्‍त्रीवादी समीक्षेची चर्चा करून कमल देसाई व भालचंद्र नेमाडे यांच्‍या निवडक कादंबऱ्याविषयी भारतीय स्‍त्रीवादी समीक्षेचे उपयोजन केले आहे. येथे त्‍यांनी पाश्‍चात्त्य स्‍त्रीवादापेक्षा भारतीय पर्यावरणातून स्‍वीकारलेला देशी दृष्टिकोन अभ्‍यासाचे वेगळेपण स्‍पष्‍ट करतो. राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील संत. त्‍यांनी ग्रामोन्‍नती व समाजोन्‍नतीचे कार्य केले. तुकडोजी महाराजांनी महिला उत्‍थानाचे केलेले लक्षणीय कार्य डॉ. स्‍वाती चौरे यांनी ‘राष्‍ट्रसंत तुकडोजी प्रणित महिलोन्‍नती’ (मार्च २०१९) या प्रबंधग्रंथात मांडले आहे. यामध्‍ये राष्‍ट्रसंतांचे चरित्र, त्‍यांची महिलाविषयक जाणीव तसेच अन्‍य संतमहात्‍मे-समाजसुधारक आणि राष्‍ट्रसंतांच्‍या महिलोन्‍नती विचारांची तुलनात्‍मक मीमांसादेखील केली आहे.   


भाषा : ‘स्‍वातंत्र्योत्तर वऱ्हाडी साहित्य’ (सप्‍टें.२००६) आणि ‘वऱ्हाडी मराठी : उद्गम आणि विकास’ (ऑक्‍टो. २००७) हे  डॉ. शोभा नाफडे यांचे ग्रंथ. वऱ्हाडी बोलीतील साहित्‍याने ग्रामीण माणसांचे जीवन, संस्‍कृती, विचार, भावभावना, सुख-दुख, ताण-तणाव व्‍यक्‍त केले आहेत. बदलत्‍या काळातील वऱ्हाडी साहित्‍याची स्‍वातंत्र्यपूर्व, स्‍वातंत्र्योत्तर व समकालीन अशी काहीशी तुलनात्‍मक, आशयात्‍मक व भाषिक मीमांसा डॉ. नाफडे यांनी केली आहे. ‘वऱ्हाडी मराठी : उद्गम आणि विकास’ (ऑक्‍टो. २००७) या ग्रंथात बोली संकल्‍पना, बोली निर्मितीची कारणे, स्‍वरूप व विशेषांची चर्चा करून वऱ्हाड प्रांतातील लोकगीते, लोककथा, वाक्‍प्रचार व इतर मौखिक साहित्‍यातील प्राचीन वऱ्हाडी भाषेचे विश्‍लेषण केले आहे.  


बालसाहित्‍य : बालसाहित्‍य हा तसा अभ्‍यासक व संशोधकांकडून दुर्लक्षित राहिलेला प्रांत. बालसाहित्‍याची समीक्षा करणे आणि ती बालकांसाठी उपयुक्‍त ठरावी या हेतूने प्रा. विद्या सुर्वे बोरसे यांनी ‘बालसाहित्‍य : आकलन आणि समीक्षा’ (ऑक्‍टो. २०१५) हा आस्‍वादात्‍मक समीक्षा ग्रंथ सिद्ध केला आहे. मुलांनी काय वाचावे? नव्हे तर पालकांनीदेखील मुलांसाठी काय वाचावे? असे सूत्र ठेवून विद्या सुर्वे यांनी लीलाधर हेगडे, बाबा भांड, अनंत भावे, माधुरी पुरंदरे, लक्ष्मीकांत देशमुख, आबा महाजन, मदन हजेरी, एकनाथ आव्हाड, सुभाष विभुते, मालविका देखणे, ग दि माडगुळकर, महावीर जोंधळे अशा ३२ बालसाहित्यिकांच्‍या कलाकृतींची आस्‍वादात्‍मक मांडणी केली आहे. प्रयोगशील बालसाहित्यिक आबा महाजन यांच्‍या साहित्‍यावरील ‘आबा गोविंदा महाजन बालस‍ाहित्‍य : आकलन आणि समीक्षा’ (ऑक्‍टो. २०१६) हा समीक्षा ग्रंथ डॉ. संगीता म्हसकर, कविता महाजन, संगीता माळी यांनी संपादीत केला आहे. आबा महाजन यांनी बालकादंबरी, बालकथा, बालकविता, बालनाट्य व पोस्‍टर कविता इ. साहित्‍य प्रकार हाताळले. त्‍यांच्या बालसाहित्‍याचे योगदान लक्षात घेऊन त्‍यांच्‍यावर अनेक समीक्षकांनी लेखन केले. यापैकी मंगेश पाडगावकर, प्राचार्य रा. रं. बोराडे यांच्‍यापासून ते डॉ. सतीश म्‍हस्‍के, विनोद सिनकर यांच्‍यापर्यंत विविध मान्‍यवर लेखक, समीक्षक व अभ्‍यासकांचे लेख ग्रंथात समाविष्‍ट केले आहेत. विशेष म्‍हणजे आबा महाजन यांचे वाङ्मयीन व्‍यक्तित्‍वदेखील विविध लेखकांनी उलगडून दाखवले आहे. याच प्रकारचा अगदी परिचयात्‍मक असलेला ‘आबा गोविंदा महाजन यांचे बालसाहित्‍य : आकलन आणि परिचय’ ( डिसें.२०१८) हा एक ग्रंथ. मैत्री लांजेवार या सहाव्‍या इयत्‍तेमध्‍ये शिक्षण घेणाऱ्या चिमुरडीने या ग्रंथाचे संपादन केले आहे. मुलांनी मुलांसाठी लिहिलेली बालसाहित्‍य समीक्षा असा मराठी साहित्‍यातील हा अभिनव समीक्षा ग्रंथ आहे. एका शालेय मुलीने मैत्रिणींना सोबत घेऊन आपल्‍याला जमेल त्‍या पद्धतीने आबा महाजन यांच्‍या बालसाहित्‍याविषयीचे आकलन मांडले आहे. मैत्रीसह ऋचा पुराणिक, उत्‍तरा गवई, विशाखा नरवाडे, दिशा कोलते, ऋचा टाकळकर, समीक्षा गवते, श्रेया भुसारी, अलविना शेख, जान्‍हवी गोरे, तनया कुळकर्णी, श्रेया खर्चे, मुक्‍ताई उचाडे, प्रीती तवर, यशश्री जवरे, वैष्‍णवी चव्‍हाण, अबोली भोकरे या सर्व चिमुरड्या वाचकांनी बालसाहित्यिक आबा गोविंदा महाजन यांच्‍या बालसाहित्‍याचा आपला प्राथमिक उद्गार व्‍यक्‍त केला आहे. या मुलींना समीक्षा वगैरे भानगडी कळत नसल्‍या तरी आम्‍हा मुलांना वाचनासाठी काय हवे आहे? याची एक उत्तम जाण आहे, हे विशेष.   


व्‍यक्‍ती आणि वाङ्मय : समीक्षक डॉ.विजया राजाध्‍यक्ष यांनी कवी विंदा करंदीकर यांच्‍या समग्र साहित्‍याचे परिशीलन करून ‘बहुपेडी विंदा’ (खंड  १ व २) (मे २००५) हा द्विखंडात्मक ग्रंथ सिद्ध केला आहे. पहिल्‍या खंडात विंदांची प्रदीर्घ मुलाखत असून विदांच्‍या समीक्षेची समीक्षा आहे. यामध्‍ये मूलभूत प्रश्‍न मांडणारे लेख, का‍ही संकल्‍पनात्‍मक इंग्रजी लेख, कवितेसंबंधीचे संकीर्ण विचार व तात्त्विक लेख, कवींविषयीचे लेख, सामाजिक व सांस्‍कृतिक भाष्‍य इ. समीक्षेची समीक्षा आहे. तर दुसऱ्या खंडात विंदांच्‍या कवितेची आशयसूत्रे, आकृतिबंध, बालकवितांची रूपविशेषात्‍मक अंगांने समीक्षा केलेली आहे. 


 ‘इरावती कर्वे : व्‍यक्‍ती आणि वाङ्मय’- डॉ. उषा कोटबागी (डिसें. २००५) या ग्रंथात मानववंशशास्‍त्र व समाजशास्‍त्राच्‍या अभ्‍यासक इरावती कर्वे यांच्‍या चरित्राबरोबरच ललित लेखन, वैचारिक लेखन व असंग्रहीत-अप्रकाशित लेखनाची समीक्षा आहे. तसेच ‘विद्याधर पुंडलिकांचे ललित साहित्‍य : स्‍वरूप व समीक्षा’ (मार्च २००८) या ग्रंथात डॉ. अरुंधती वैद्य यांनी पुंडलिकांच्‍या समग्र साहित्‍याचे सूक्ष्‍म, साक्षेपी व मर्मग्राही असे विस्‍तृत विवेचन करत पुंडलिकांनी मराठी कथेला प्राप्‍त करून दिलेल्‍या वेगळ्या परिणामांचा वेध घेतला आहे. मराठी साहित्‍यातील महत्त्वाचे कादंबरीकार व साक्षेपी समीक्षक त्र्यं. वि. सरदेशमुख यांच्‍या साहित्‍य व चरित्राचा अभ्‍यास डॉ. प्रिया प्रदीप निघोजकर यांनी ‘त्र्यं. वि. सरदेशमुख : आत्‍मनिष्‍ठ लेखकाची बखर’ प्रबंधग्रंथात सिद्ध केला आहे. हा ग्रंथ देखील व्‍यक्‍ती आणि वाङ्मय या पारंपरिक साच्यातील आहे. 


प्रख्‍यात लेखक श्‍याम मनोहर यांनी कथा, कादंबरी व नाटक असे साहित्‍यप्रकार हाताळले आहेत. त्‍यांच्या समग्र साहित्‍य व व्यक्तित्‍वाचा अभ्‍यास डॉ. शशिकला कांबळे यांनी ‘स्‍वातंत्र्योत्‍तर मराठी साहित्‍य आणि श्‍याम मनोहर’ (जाने. २०११) या ग्रंथाद्वारे मांडत श्‍याम मनोहरांचे स्‍वातंत्र्योत्तर मराठी साहित्यातील स्‍थान निश्चितीसंदर्भात विश्‍लेषण केले आहे. ‘प्रवाह आणि प्रपात’ (एप्रिल २०११) या पुस्‍तकात डॉ. लीना निकम यांनी ज्‍येष्‍ठ ग्रामीण साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे यांच्या व्‍यक्तित्‍व आणि साहित्‍याची समीक्षा केली आहे. 


लोकसाहित्‍याचे अभ्‍यासक तथा समीक्षक डॉ. मधुकर वाकोडे यांच्‍या समग्र साहित्‍याचा अभ्‍यास डॉ. शरयू तायडे यांनी ‘डॉ. मधुकर  वाकोडे : साहित्‍य दर्शन’ (सप्‍टें. २०११) या ग्रंथात मांडला आहे. येथे पारंपरिक पद्धतीने लेखकाचे व्‍यक्तित्‍व ते साहित्‍य असा आकृतिबंध आहे. प्राचार्य के. ज. पुरोहित यांच्‍या व्‍यक्तित्‍व आणि साहित्‍याचा डॉ.सुरेखा सबनीस यांनी सिद्ध केलेला प्रबंधग्रंथ म्‍हणजे ‘शांताराम : व्‍यक्‍ती आणि वाङ्मय’(नोव्‍हें. २०११) होय. प्रिंसिपल के. ज. पुरोहित यांच्‍या लौकिक व्‍यक्तिमत्त्वाबरोबरच कथा, ललित लेख व समीक्षा ग्रंथाची सबनीस यांनी मीमांसा केली आहे. याप्रमाणेच कवी, गीतकार गंगाधर महांबरे यांच्‍या कर्तृत्‍व व साहित्याची समीक्षा ‘गंगाधर महांबरे यांची लेखनशैली आणि जीवनदृष्टी’-डॉ. शैलजा पाटील (जाने. २०१८) या ग्रंथात आहे. 


‘अरूण कोलटकरांची मराठी कविता’(मे २०१८) हा डॉ.वैजयंती जाधव-भोसले यांचा प्रबंधग्रंथ. मराठी आणि इंग्रजी भाषेत कविता लिहिणाऱ्या अरूण कोलटकरांच्‍या कवितेचे विश्‍लेषण करताना डॉ.वैजयंती यांनी आधुनिकतावादी मराठी व पाश्‍चात्त्य कवितेची परंपरा, कोलटकरांचे वाङ्मयीन व्‍यक्तिमत्त्व, त्‍यांच्‍या कवितेतील आशयसूत्रे, कवितेचा रूपबंध व भाषा आणि कवितेतील पृथगात्‍मता अशी मांडणी केली आहे.    


अन्‍य : ‘लौकिकतावादी साहित्‍यविचार’ (२००१) हा अरूणा देशमुख यांचा समीक्षाग्रंथ. या ग्रंथाचे शीर्षक साहित्‍यविचार असे जरी असले तरी यामध्‍ये लौकिकतावादी साहित्‍यविचार, साहित्‍याचे मर्मबंध व साहित्‍यसंवाद या शीर्षकाअंतर्गत त्‍यांनी काही साहित्‍यकृतींची स्‍त्रीवादी दृष्‍टीने समीक्षा केलेली आहे. याप्रमाणेच डॉ. प्रतिमा इंगोले यांनी वेळोवेळी विविध कलाकृतींविषयी केलेल्‍या लेखनाचा ‘आस्‍वादगंध’ (सप्‍टें. २००२) हा आस्‍वादात्‍मक समीक्षा ग्रंथ आहे. पारंपरिक पद्धतीचा आस्वाद आणि शास्‍त्रीय पद्धतीची समीक्षा या कोणत्‍याही प्रकारची चाकोरी न स्‍वीकारता वासंती देशपांडे यांनी ‘त्‍यांनी उभी केलेली माणसं’ या ग्रंथात भारतीय व पाश्‍चात्त्य अशा ५४ लेखकांच्‍या अजरामर कलाकृतीतील अजरामर व्‍यक्तिरेखांची वास्तववादी मीमांसा करीत प्रत्‍यक्षातल्या मानवी जगण्‍याचा संबंध जोडून अनोख्‍या पद्धतीने अन्‍वयार्थ प्रस्‍थापित केला आहे. विशेष म्‍हणजे या माध्‍यमातून त्‍यांनी त्‍या-त्‍या लेखकांच्‍या वृत्ती-प्रवृत्तींचादेखील वेध घेतला आहे. 


‘सत्‍यकथा’ या नियतकालिकाने नवकथा, नवकविता यासोबतच नवसाहित्‍याचा स्‍वीकार केला. अनेक लेखक, कवींना घडविण्‍याचे कार्य केले. मराठी साहित्‍यात योगदान दिले. ‘सत्‍यकथे’ने १९३३ ते १९८२ या काळात दिलेल्‍या योगदानाचा अभ्‍यास डॉ. लीला वेदपाठक यांनी ‘सत्‍यकथा : एक साहित्यिक मानदंड’द्वारे (२००९) प्रस्‍तुत केला आहे. डॉ. लीला यांनी नियतकालिकांचे प्रसिद्धी काळ, वाचकवर्ग व आशयदृष्‍ट्या वर्गीकरण करून मराठी वाङ्मयीन नियतकालिके व ललितलेखांचा आढावा घेतला आहे. ‘स्त्रियांचे गद्यलेखन (१८५० ते १६२०)’ हा देखील डॉ. मधुबाला खोपडे यांचा प्रबंधारित समीक्षा ग्रंथ. या ग्रंथात खोपडे यांनी १८५० ते १९२० या काळातील  स्त्रियांच्‍या कथा, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्‍मचरित्र, प्रवासवर्णन व अन्‍य गद्य साहित्‍याची सामाजिक व सांस्‍कृतिक अंगाने मांडणी करताना सदरील स्त्रियांच्‍या लेखनात स्‍त्री शिक्षण, देशप्रेम, पातिव्रत्‍य, ईश्‍वरनिष्‍ठा, रूढी-परंपरा आदी मूल्‍ये केंद्रस्‍थानी असल्‍याचे विवेचन केले आहे. तर डॉ. प्राची जोशी यांनी ‘साहित्‍य आस्‍वाद’ व ‘कादंबरी आस्‍वाद’ (२०१४) या दोन ग्रंथात विविध ग्रंथाविषयीची परीक्षणे, आस्‍वादात्‍मक समीक्षा केलेली आहे. डॉ. नीता मेश्राम पाटील यांनी तुलनात्‍मक अभ्‍यासाच्‍या माध्‍यमातून ‘तौलनिक साहित्‍याभ्‍यास : संकल्‍पना व विचार’(२०१९) हा तौलनिक साहित्‍याची तात्त्विक मीमांसा करणारा ग्रंथ सिद्ध केला आहे. 


खरे तर उपयोजित समीक्षेची यादी दीर्घ होऊ शकते. गत २० वर्षातील उपलब्‍ध झालेल्या ग्रंथांची येथे प्रातिनिधिक दखल घेतली आहे. या ग्रंथांमध्ये प्रबंध ग्रंथांचे प्रमाण अधिक आहे. प्रबंधांमध्‍ये संकलन व आशयात्‍मक मांडणी-कथानक सांगणे हा भाग अधिक असतो. यामुळे आशयवृद्धी होते पण सैद्धांतिक/नवा विचार मात्र दिला जात नाही. बहुसंख्‍य प्रबंध ग्रंथांचा एक आकृतिबंध ठरलेला असतो. त्‍या आकृतिबंधाला मोडीत काढून ठरावीक अभ्‍यासक स्त्रियांनी वेगळी, नावीन्‍यपूर्ण, नव अभ्‍यासकांना दिशा देणारी मांडणी केल्‍याचे स्‍पष्‍टपणे जाणवते. उपयोजित  समीक्षा म्हणजे मुक्‍तपणे केलेली समीक्षा नव्हे, तर या समीक्षेचेदेखील काही निकष ठरलेले असतात. तिची उभारणीदेखील सैद्धांतिक पायावरच असते. समग्र मराठी साहित्‍यात या उपयोजित समीक्षेचे प्रमाण वाढल्‍याने आणि सैद्धांतिकचे प्रमाण कमी असल्याने यापासून उलटा पिरॅमिड तयार झाला आहे. जो काळानुसार अधिक विस्‍तारत आहे. 


विद्यापीठीय मराठी विभाग व साहित्‍य संस्‍थांचे कार्य : १८५७ ला मुंबई विद्यापीठाची स्‍थापना झाली. मराठी विभाग सुरू झाला. तत्‍काळात या विभागात अभ्‍यासक्रमासाठी नेमलेल्‍या कलाकृतींविषयी मराठीत समीक्षा उपलब्‍ध नव्‍हती. तेव्‍हा विद्यार्थ्‍यांना अध्‍ययन सुलभ व्‍हावे या हेतूने प्राध्‍यापकांनी कलाकृतीविषयी लिहायला सुरुवात केली. यामाध्‍यमातून मराठीत समीक्षा ग्रंथ निर्माण झाले. मुंबई>पुणे>कोल्हापूर या विद्यापीठाच्‍या मराठी विभागांनी विविध चर्चासत्र, परिषदा व ठरवून लिहिणे या पद्धतीने २० व्‍या शतकापर्यंत मराठी समीक्षेत मोलाचे योगदान दिले आहे. तद्वतच तेथे कार्यरत अध्‍यापकांचीदेखील समीक्षेत महत्त्वाची कामगिरी राहिलेली आहे. आजघडीला महाराष्‍ट्रात ११ विद्यापीठे व १ मुक्‍त विद्यापीठ आहे; पण अलीकडील काळात बोटावर मोजण्‍याइतपत अपवाद (समीक्षेतील नव्‍या संकल्‍पना, मराठवाड्यातील साहित्‍य, समीक्षापद्धती : सिद्धांत आणि उपयोजन, तपोनिधी इ.) वगळता विद्यापीठांच्‍या मराठी विभागातून असे प्रयत्‍न होताना दिसत नाहीत. पूर्वी विद्यापीठे वा त्‍यांचे विभाग स्‍वत: ग्रंथ प्र‍काशित करीत असत आता या प्रकारच्‍या प्रकाशनांचा अभाव आहे. सद्य:स्थितीत विविध विद्यापीठांमध्‍ये कार्यरत असणाऱ्या अध्‍यापकांपैकी वंदना महाजन, श्‍यामल बनसोड (मुंबई), अरूणा दुभाषी (एसएनडीटी), विद्यागौरी टिळक (पुणे), मोना चिमोटे (अमरावती) इ. स्त्रियांचे समीक्षा लेखन प्रकाशित आहे. (खरे तर कार्यरत स्त्रियांचे प्रमाण खूप अल्‍प आहे.) यापैकी काहींनी आपली क्षमता सिद्ध केली आहे तर काहीजणी स्‍वत:ला सिद्ध करण्‍यासाठी धडपडत आहेत. काही सन्‍माननीय अपवाद वगळता सैद्धान्तिक/उपयोजित समीक्षेत भरीव योगदानाचा मात्र अभाव जाणवतो. राज्‍य शासनाच्‍या भाषा विभागाअंतर्गत महाराष्‍ट्र राज्‍य मराठी विश्‍वकोश निर्मिती मंडळ, महाराष्‍ट्र राज्‍य साहित्‍य आणि संस्‍कृती मंडळ, राज्‍य मराठी विकास संस्‍था इ. संस्‍था कार्यरत आहेत. त्‍यांचे कार्य 'सुरू आहे' असे म्‍हणता येते. भाषा संचालनालय व अंतर्गत संस्‍थांचे कार्य आणि अखिल भारतीय मराठी साहित्‍य महामंडळ व घटक संस्‍थांचे स्‍त्री साहित्‍य व समीक्षेतील योगदान हा स्‍वतंत्र विषय आहे. तरीही येथे काही महत्त्वपूर्ण नोंदी करणे आवश्‍यक वाटते. अखिल भारतीय मराठी साहित्‍य मंहामंडळाच्‍या मराठी साहित्य संघ (मुंबई), महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे), मराठवाडा साहित्य परिषद (औरंगाबाद) व विदर्भ साहित्य संघ (नागपूर) या मूळ घटक संस्‍था आहेत. या व अन्‍य संस्‍थांची मुखपत्रे आहेत. त्‍यांचे आलेले विशेषांक ऐतिहासिक आहेतच. त्‍याशिवाय  महाराष्‍ट्र साहित्‍य परिषदेने ‘मराठी वाङ्मयाचा इतिहास’ निर्मितीमध्‍ये अत्‍यंत महत्‍त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. त्‍याच प्रकारचा इतिहासात्‍मक ग्रंथ म्‍हणजे ‘भारतीय भाषांतील स्‍त्रीवादी साहित्‍य’-संपादन डॉ. अश्विनी धोंगडे (जाने. २०१६) होय. हा समीक्षा ग्रंथ नसला तरी स्‍त्री साहित्‍य, समीक्षा व स्‍त्री समीक्षक म्‍हणून महत्त्वाचा आहे. मराठवाडा साहित्‍य परिषद, औरंगाबाद या संस्‍थेने ‘मराठवाडा लेखिका साहित्‍य संमेलना’द्वारे स्‍त्री साहित्‍य व समीक्षाविषयक घडामोडींना बळ पुरवण्‍याचे कार्य केले आहे. करीत आहेत. 


पुस्‍तक परीक्षण : 

ज्‍येष्‍ठ लेखक प्रा.रंगनाथ पठारे म्‍हणतात त्‍याप्रमाणे आजच्‍या समीक्षकांचे तीन वर्ग आहेत. एक म्‍हणजे परीक्षणवजा लिहिणारा, दुसरा समीक्षेला काही देणारा आणि तिसरा भाषिक समाजाची अभिरूची घडविणारा. पहिला वर्ग वगळता दुसऱ्या दोन वर्गांची कामगिरी ‘चांगली’ आणि ‘बरीच’ म्‍हणावी लागते. पहिल्‍या वर्गासोबतच विविध नियतकालिके व वर्तमानपत्रांनी या समीक्षेत मोठी भर घातलेली आहे. परंतु वृत्तपत्रीय पुरवण्‍यातील समीक्षेला गांभीर्याने घेण्‍याची गरज नसल्‍याचे मत दिगंबर पाध्‍ये यांचे आहे. ज्‍येष्‍ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांनीदेखील वृत्तपत्रीय समीक्षेला रंजनाच्‍या पलीकडे स्‍थान नसल्‍याचे म्‍हटले आहे. पुस्‍तक परीक्षणांमुळे कथा, कविता, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्‍मचरित्र, ललितगद्य या प्रकारांचा विकासक्रम आणि त्‍यामधील सत्त्व शोधण्‍याचाही प्रयत्‍न होतो. तसेच लेखकलक्ष्‍यी, संहितालक्ष्‍यी, संदर्भलक्ष्‍यी यांच्‍यासोबतच जातलक्ष्‍यी, धर्मलक्ष्‍यी, प्रांतलक्ष्‍यी, वर्तुळलक्ष्‍यी, पुरस्‍कारलक्ष्‍यी, प्रसिद्धीलक्ष्‍यी इ. प्रयोजनांमुळे उपयोजित समीक्षेचा सुकाळ आहे. खरे तर एखाद्या विषयाच्‍या मुळाशी जाऊन विचार करणे, चर्चेमध्‍ये सहभागी होणे, वाद-प्रतिवाद, युक्तिवाद होणे आवश्‍यक असते. त्‍यातूनच उत्‍तम समीक्षा व समीक्षक समोर येऊ शकतात. अलीकडे विद्यापीठ अनुदान आयोगाने आणलेली स्‍थाननिश्चिती पद्धत, इम्‍पॅक्‍ट फॅक्‍टर, राष्‍ट्रीय-आंतरराष्‍ट्रीय चर्चासत्र व शोधनिबंधांच्‍या चक्रव्‍यूहात समग्र प्राध्‍यापक वर्ग अडकला आहे. तद्वतच वृत्तपत्रातील पुस्‍तक परिचय शंभर-दोनशे-तीनशे शब्‍दांत अडकले आहे. शब्‍द मर्यादेतील परीक्षण पद्धतीची चौकट मोडीत काढून तिला अधिकाधिक नियतकालिकांकडे घेऊन गेल्‍यास आस्‍वादक/उपयोजित समीक्षेत एक सकारात्‍मक चित्र दिसू शकते. 


* विशेष नोंद : १ : आतापर्यंत ९३ अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलने संपन्‍न झाली आहेत. या संमेलनाच्‍या ९३ अध्‍यक्षांपैकी केवळ ५ स्‍त्री साहित्यिकांना अध्‍यक्षपदी विराजमान होण्‍याचा सन्‍मान मिळालेला आहे. यापैकी कुसमावती देशपांडे, दुर्गा भागवत, विजया राजाध्‍यक्ष व अरूणा ढेरे यांचे समीक्षा क्षेत्रातील योगदान महत्त्वपूर्ण आहे.


* विशेष नोंद : २ : समीक्षा या प्रकारात अंतर्भूत नसलेले परंतु स्‍त्री साहित्‍याचा मागोवा घेण्‍याचे कार्य भारती विद्यापीठ अभिमत विश्‍वविद्यालय  आणि साहित्‍यप्रेमी भगिनी मंडळ, पुणे यांनी ‘स्‍त्री साहित्‍याचा मागोवा’ खंड १ ते ४ द्वारे केले. या चार खंडांच्‍या संपादनात डॉ. मंदा खांडगे, डॉ.लीला दीक्षित, डॉ.अरुणा ढेरे, विनया खडपेकर, मंजरी ताम्‍हणकर, डॉ.नी‍लिमा गुंडी व डॉ.ज्‍योत्‍स्‍ना आफळे यांनी डॉ.सरोजिनी वैद्य यांच्‍या मार्गदर्शनाखाली ऐतिहासिक योगदान दिले आहे. हा इ.स. १८५० ते २०१० असा १६० वर्षातील स्‍त्री साहित्यिकांच्‍या योगदानाचा आढावा आहे. 


थोडक्‍यात, २० व्‍या शतकातील समीक्षा ही साहित्‍याचे स्‍वरूप, प्रयोजने, साहित्‍याचे कार्य, कलावाद-जीवनवाद या प्रश्‍नांशी संब‍ंधित होती. आज २१ व्‍या शतकात तिचे स्‍वरूप बदलले आहे.  स्‍त्री समीक्षकांचे योगदान लक्षवेधक आहे. परंतु स्‍त्री समीक्षकांनी स्‍त्रीवादाच्‍या पलीकडे जाऊन विविध दृष्टिकोन, तत्त्वप्रणालीचा मराठी पर्यावरणीय दृष्‍टीने स्‍वीकार करण्‍याची आवश्‍यकता आहे. ज्‍या स्‍त्रीवादी समीक्षेचा अवलंब अधिक प्रमाणात केला जातो, तीमध्‍ये कलाकृतीचे पुनर्वाचन, पुनर्आकलन, पुनर्विश्‍लेषण व पुनर्मूल्‍यमापनाची अपेक्षा व्‍यक्‍त केलेली आहे, तिचा स्‍वीकार करून समग्र मराठी साहित्‍याकडे पाहता येऊ शकते. त्‍यातून नावीन्‍यपूर्ण विचार समोर येईल. आजही साहित्‍याची अनेक क्षेत्रे स्‍त्री समीक्षकांपासून अलक्षित राहिलेली आहेत. मराठी साहित्‍यात प्रचलित असणारे विविध वाद/सिद्धांताची आपल्‍या परिप्रेक्ष्‍यातून समीक्षा होणे आवश्‍यक आहे. विविध वाङ्मयीन प्रवाह, त्‍यांची विचारप्रणाली, आणि साहित्‍य यांचीदेखील सुयोग्‍य समीक्षा झाली नाही. या प्रवाहांच्‍या तत्त्वप्रणालीनुसार नवे समीक्षा दृष्टिकोन शोधणे, त्‍यांची मांडणी करणे ही समीक्षकांची जबाबदारी आहे. सांस्‍कृतिक, पर्यावरणीय, भाषासंरचना, शैली, मनोविश्‍लेषणात्‍मक, आदिबंधात्‍मक, चरित्रात्‍मक, ऐतिहासिक, देशीवाद, गांधीवाद, आंबेडकरवाद इ. बरोबरच बालसाहित्‍य, ललित गद्य, स्‍फुट लेखन इत्यादींचे समीक्षेला वावडे असू नये. समकाळातील भाषा व समकाळातील स्‍त्री साहित्यिकांच्‍या साहित्‍य व व्‍यक्तित्‍वाकडेदेखील स्‍त्री समीक्षकांनी लक्ष देणे आवश्‍यक आहे. समीक्षा व्यवहार हा साहित्यिक-प्रकाशक-वाचक-समीक्षक इ. सर्वांनी मिळून पूर्ण होतो. आपल्‍याकडे सृजनशील साहित्यिकांकडून समीक्षेची उपेक्षा केली जाते. प्रकाशक बाजारपेठेचे कारण देत समीक्षाग्रंथ प्रकाशित करीत नाहीत. कलेकडे कला म्‍हणून पाहण्‍याचा, तिचा आस्‍वाद घेण्‍याचा दृष्टिकोन विकसित न झाल्‍याने लेखक/कवींनी माफी मागणे, अभ्‍यासक्रमातून कलाकृती वगळणे, कलाकृती नष्‍ट करणे अशा कृती सतत घडतात. याचाच अर्थ  समीक्षकांकडून वाचकांची अभिरूची अद्यापही समृद्ध होऊ शकलेली नाही? की मराठी साहित्‍यदेखील वाचकांच्‍या जाणिवा समृद्ध करू शकलेले नाही?


संदर्भ : 

१.किंबहुने, रवींद्र. "सैद्धांतिक समीक्षा." खोले, विलास. विसाव्‍या शतकातील मराठी समीक्षा. पुणे : प्रतिमा प्रकाशन, १३ डिसेंबर २००४. २२५.

२. थोरात, हरिश्‍चंद्र. "साहित्‍य क्षेत्रातील बदल." मुक्‍त शब्‍द वर्ष सातवे, अंक नववा जाने. २०१७ : ९.

३. पठारे, रंगनाथ. "समीक्षा साहित्‍यनिर्मितीस साहाय्यभूत ठरते का?" ललित एप्रिल २०१३ : १४.

४. पाध्‍ये, दिगंबर. "पुस्‍तक परीक्षणांचे फलित." ललित एप्रिल २०१३ : १३५.

५. रसाळ, सुधीर. "चंद्रकान्‍त पाटील यांनी घेतलेली मुलाखत." प्रतिष्‍ठान वर्ष ५७, अंक दुसरा, डिसेंबर २००९ : ७५.

६. रसाळ, सुधीर. "मराठी समीक्षा : आजची अवस्‍था." सजग ऑक्‍टो.-नोव्‍हें. २०१९ : १३ .


कैलास अंभुरे

मो. ७५८८१६५२२१

dr.kailas.ambhure@gmail.com


(अखिल भारतीय मराठी साहित्‍य महामंडळाच्‍या ‘अक्षरयात्रा’ [संपा. डॉ. दादा गोरे] या वार्षिक अंकामध्‍ये प्रस्‍तुत लेखातील संक्षिप्‍त भाग प्रसिद्ध झालेला आहे.)

Comments